हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आज मुंबई दिमाखात उभी; छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या भावना

मराठी माणसाला न्याय देण्यासाठी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो संघर्ष केला, त्यामुळेच आज मुंबई दिमाखात उभी आहे. यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान आजही माझ्या हृदयात आहे. तर आमचे नेते शरद पवार हे शरीरात आहेत, असे उद्गार माजी मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.

अभंग पुस्तकालय आणि प्रकाशनच्या वतीने अमृतमहोत्सवानिमित्त कुसुम सभागृहात भुजबळ यांचा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर व अभंग पुस्तकालयाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी घेतलेल्या प्रगट मुलाखतीत ते बोलत होते.

भुजबळ म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवर झालेल्या भाषणाने मी भारावून गेलो आणि मराठी माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला, त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश केला. त्या काळात मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक मिळायची, सरकारी नोकर्‍यांमध्ये उपेक्षा केली जायची. त्यामुळे ‘मार्मिक’च्या माध्यमातून मराठी माणसाच्या संघर्षाचा आवाज त्यांनी बुलंद केला. परप्रांतीय मंडळी मराठी माणसांची अहवेलना करायचे. ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची,’ असे उपहासात्मक टोमणे मारले जायचे. त्यावेळी मराठी माणसाला सरकारी नोकर्‍यांमध्ये स्थान मिळावे, यासाठी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला.

एअरपोर्ट विमानसेवेत मराठी माणसाला हाकलणार्‍या व त्यांचा आपमान करणार्‍या एका अधिकार्‍याच्या कार्यालयात घेराव घालून कानाखाली आवाज काढणाऱ्या शिवसैनिकांचा प्रसंग आणि त्यांनतर मराठी माणसाचा झालेला सन्मान हा एक बदल तेथून बघायला मिळाला. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे स्थान माझ्या हृदयात कायम आहे. मंडळ आयोगाच्या शिफारशीसंदर्भात आमचे मतभेद झाले आणि मी पक्ष सोडला. मात्र, त्यांचे स्थान हे अढळ असून, शरद पवार माझ्या शरीरात असल्याचे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला नवतेज दिले
तुम्हाला उद्धव ठाकरे आवडतात की राज ठाकरे, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. भुजबळ, राणे, राज ठाकरे यांनी पक्ष सोडला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सोबत असलेल्या नेते मंडळी व शिवसैनिकांसोबत पक्षाची धुरा सांभाळली आणि शिवसेनेला पुन्हा वैभव निर्माण करून दिले. हलाखीच्या परिस्थितीत एवढी वाताहत झाली असताना एखादा प्रमुख अंथरुणाला खिळून बसला असता. मात्र, न डगमगता उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बांधणी करून पक्षाला नवतेज निर्माण करून दिले. भाजपने साथ सोडल्यानंतर 2014 ला स्वतंत्रपणे निवडणुका लढवून शिवसेनेची स्थिती मजबूत केली. नजीकच्या काळात घडलेले नाट्य व आमदारांनी सोडलेली साथ ही परिस्थिती बिकट असताना याही काळात सोबत असलेल्या मंडळींना घेऊन ते पक्ष वाढवत आहेत. आजही त्यांच्या सभांना गर्दी होत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कोरोनाकाळात त्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. येणार्‍या काळात महाविकास आघाडी एकजुटीने महाराष्ट्रात लढेल आणि जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रातील सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना वेठीस धरण्याचे काम केंद्र सरकार करत असून, लोकशाहीमध्ये सत्याची भूमिका मांडणार्‍या राजकीय मंडळीवर प्रामुख्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांना ईडी, सीबीआय व आयकर विभागाचा बडगा दाखवून संविधानाचा अपमान केला जात आहे. नोटाबंदी, जीएसटीसारखे निर्णय लादून जनतेला, व्यापार्‍याला त्रस्त केले जात आहे. महागाई, भ्रष्टाचार याविरुद्ध केंद्र सरकारने निवडणूक काळात केलेल्या घोषणा हवेत विरल्या, असा आरोप करून हुकूमशाही पद्धतीने राजकारण या देशात चालत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

मविआ एकीचे बळ दाखवून देईल
नुकत्याच झालेल्या राज्यातील विधानसभा व विधान परिषदेच्या निवडणुका लिटमस टेस्टमध्ये महाविकास आघाडी उत्तीर्ण झाली असून नागपूर, अमरावती, कसबामधील विजय निश्चितच विचार करण्याजोगा आहे. यामुळेच निवडणुका घेण्यास हे सरकार मागे-पुढे पाहात आहे. महाविकास आघाडीची एकजूट येणार्‍या सर्व निवडणुकीत आमच्या एकीचे बळ दाखवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक ‘अभंग’चे संजीव कुलकर्णी यांनी केले. यावेळी माजी मंत्री अशोक चव्हाण यांनीही मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विश्वाधार देशमुख यांनी केले.

फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून आवडतील
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून आवडतील का विरोधी पक्षनेते म्हणून? असा प्रश्न मुलाखतकार प्रवीण बर्दापूरकर यांनी विचारला, त्यावेळी भुजबळ यांनी फडणवीस हे प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून मला जास्त आवडतील, असा खोचक टोला लगावला. मीदेखील 1995 ते 1999 या काळात विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता होतो. एकंदर विरोधी पक्षनेत्यांचा कालखंड लक्षात घेता एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेतेपद सांभाळताना अभ्यासपूर्ण विवेचन केले होते. येणार्‍या काळात फडणवीस हे मुख्यमंत्री होण्यापेक्षा ते विरोधी पक्षनेते झालेले जास्त आवडेल, कारण त्यांचा वेगवेगळ्या विषयावरचा अभ्यास दांडगा आहे, असेही ते म्हणाले.