कोरोना लसीकरणासाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज – छगन भुजबळ

नाशिक जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्व तयारी करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज आहेत, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छागन भुजबळ यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच आरोग्य यंत्रणेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात नियोजन करावे. जेणेकरून शाळा सुरू होण्याच्या कालावधीपर्यंत सर्व संबंधित शिक्षक व शाळेतील कर्मचारी वर्ग यांचा कोविड तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त होवून शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना अडचण निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व नियमित सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य राहील, असेही भुजबळ यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तसेच राज्याच्या 2.6 टक्के मृत्यूदराच्या तुलनेत जिल्ह्याच्या मृत्यूदर 1.6 टक्के इतकाच असल्याने जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाट येण्याची शक्यता कमी वाटते असे भुजबळ म्हणाले.

येत्या काही महिन्यात उपलब्ध होणाऱ्या कोविड लसीबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या लसींची निर्मीती करण्यात येत असून या लसी देण्याचे प्रमाण व पद्धती देखील भिन्न आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एकाच प्रकारची लस उपलब्ध होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी बैठकीत केले. याबाबत राज्य स्तरावर मुद्दा उपस्थित करण्यात येईल असे भुजबळ यांनी आश्वासन दिले.

या लसीकरण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. या लसीकरणासाठी जिल्ह्यात 650 लसीकरणाचे बुथ निर्माण करण्यात येणार असून एका बुथवर किमान 100 नागरिकांना एका दिवसात लसीकरण केले जाईल, या दृष्टिने प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे. तसेच एक लस ही काही दिवसांच्या अंतराने दोन वेळा देण्यात येणार असल्याने त्याबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणाकडून तयारी करण्यात येत आहे, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली आहे.

एकंदरीतच लसीकरणाच्या कार्यक्रमासंदर्भात सर्वांनाच असलेल्या कुतूहलाचा विचार करून अधिकृत माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे दृष्टीने या बैठकीत पत्रकारांसाठी विशेष सादरीकरणाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले होते. या सादरीकरणाद्वारे कोविड लसीबाबतची सविस्तर माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. प्रकाश नंदापूरकर यांनी सर्व पत्रकारांना करून दिली व त्यांच्या शंकांचे समाधान केले.

आपली प्रतिक्रिया द्या