संगीताच्या माध्यमातून उलगडणारा ‘छंद प्रितीचा’

सामना ऑनलाईन । मुंबई

कलावंताच्या छंदाप्रती असणारे प्रेम आणि त्यातूनच कलावंताच्या आयुष्यात होत जाणारे बदल एका संगीतमय कहाणीच्या माध्यमातून ‘छंद प्रितीचा’ या चित्रपटात मांडले आहेत. हा चित्रपट बघताना ७० च्या दशकातील तमाशाच्या पार्टीची नक्कीच तुम्हाला आठवण होईल.

कलेवरील प्रेमाखातर वडिलोपार्जित संपत्तीची आशा सोडून आपले आयुष्य कलेला वाहून घेणाऱ्या शाहीराची ही कथा…लोकगीतांचा वारसा लाभलेल्या या चित्रपटाचे कथानक फिरते ते म्हणजे शाहीर सत्यवान (हर्ष कुलकर्णी), नृत्यांगना चंद्रा (सुवर्णा काळे) आणि ढोलकीसम्राट (सुबोध भावे) यांच्याभोवती…

‘छंद प्रितीचा’ मधील ढोलकीवाला हा खूप शांत सरळमार्गी, भीकमागून खाणारा जरी असला तरी स्वत:ची योग्यता जपणारा असून तो ढोलकीच्या वादनात पारंगत आहे. शाहीर हा स्वभावाने खूप चांगला असून त्याला गाणी लिहिण्याचा छंद आहे. त्याची गाणी लोकांसमोर यावीत आणि मोठ्या शाहिरांमध्ये आपले नाव घेतले जावे अशी त्याची इच्छा आहे. चंद्रा ही नृत्यांगना असून तिला आई नसल्याने तिला हवं ते करणारी, हट्टी व स्वभावाने थोडी उर्मटही आहे. मरणापूर्वी तिला आईने सांगितले असते की, दुनियामध्ये काहीही कर, नोकरी कर, कुठेही मोल मजूरी करून पोट भर पण पायात चाळ बांधू नकोस, पण चंद्राच्या रक्तात नाच-गाणे असल्याने ते तिला स्वस्थ बसू देत नाही. ती पायात घुंगरू बांधून उभी राहते आणि त्यांनतर चित्रपटाची कथा समोर येते.

शाहीर हा श्रीमंत आणि घरंदाज मुलगा असूनही निव्वळ कलेच्या प्रेमाखातर तो घरदार सोडतो आणि चंद्राच्या साथीने तमाशापार्टी काढतो. चंद्राच्या नृत्याला तितक्याच ताकदीची ढोलकीची साथ मिळावी म्हणून नव्या ढोलकीवाल्याचा शोध सुरू होतो. हा ढोलकीवाला त्यांना मिळतो आणि त्यातून कथा हळूहळू कशी बदलत जाते. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या चित्रपटाच्या कथेला लोकसंगीताचा बाज लाभला आहे. चित्रपटाच्या कथेला साजेसं संगीत प्रवीण कुवर यांनी दिले असून बेला शेंडे, आदर्श शिंदे, जावेद अली, केतकी माटेगावकर, वैशाली सामंत, आणि नंदेश उमप यांसारख्या दिग्गजांचे स्वरही लाभले आहेत. या चित्रपटात सुबोध भावे, सुवर्णा काळे आणि हर्ष कुलकर्णीबरोबर यांच्यासोबत विकास समुद्रे, शरद पोंक्षे, गणेश यादव, सुहासिनी देशपांडे, अभिषेक कुलकर्णी आणि विशाल कुलथे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक एन. रेळेकर यांनी केले असून दिग्दर्शनाबरोबरच कथा – पटकथा – गीतलेखनाची धुराही एन. रेळेकर यांनीच सांभाळली आहे. तर निर्मिती चंद्रकांत जाधव यांनी केली आहे.