हाऊसफुल्ल – स्तब्ध करणारा संवेदनशील अनुभव

1943
chhapaak

>> वैष्णवी कानविंदे – पिंगे

प्रत्येक मुलीची काही स्वप्नं असतात. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, आपला जोडीदार कसा असावा हे ठरवायचा अधिकार प्रत्येकीला आहे. एवढंच नाही तर काय कपडे घालावेत, कोणाशी बोलावं, कुठे नकार द्यावा हे सगळं ती स्वतः ठरवू शकते, पण दुर्दैवाने समाजात सगळ्यांनाच ते पचत नाही. काही जण तिच्याकडून आलेला नकार हा आपल्या पौरुष्याचा अपमान समजून तिला आयुष्यातून उठवायचा नाकर्तेपणा करतात. मग खून, बलात्कार किंवा चेहऱयावर ऑसिड फेकून शारीरिक, मानसिक यातना देत तिच्या स्वाभिमानाचा चुथडा करायचा ही अत्यंत विकृत मानसिकता, त्यातून उद्ध्वस्त होणारी आयुष्यं आणि त्या आयुष्यांचं भविष्य असा अत्यंत संवेदनशील विषय तितक्याच संवेदनशील दिग्दर्शिकेने अलगदपणे हाताळला आहे. ऑसिड हल्ल्यासारखा विषय घेऊन सिनेमा करणं आणि बॉलीवूडमधल्या अत्यंत ग्लॅमरस अशा दीपिका पदुकोणने त्यात प्रमुख भूमिका साकारणं हे सगळंच कमालीचं कौतुकास्पद आहे.

ही कथा आहे एका गरीब घरातल्या सुंदर, स्वप्नाळू मुलीची. बारावीमध्ये शिकत असताना रिऑलिटी शोमध्ये जिंकायचं स्वप्न बघत असताना अचानक तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा एक युवक ऑसिड हल्ला करतो. ती चक्क आयुष्य उद्ध्वस्त होतं. तिचं सौंदर्य, आत्मविश्वास… सगळंच संपून जातं, पण दरम्यान एका महिला वकिलाच्या पाठिंब्याने ती पुन्हा उभी राहते. एवढेच नाही, तर ऑसिड विक्री बंद व्हावी म्हणून पीआयएल टाकते आणि हा लढा निकराने देत आपल्यासारख्या अनेकींना जगण्याचा दिलासादेखील देते. मग कोर्टाची लढाई ती जिंकते का? आयुष्याच्या लढाईचं काय होतं? आयुष्य पुन्हा सुरळीत जगणं शक्य असतं का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हा सिनेमा पाहताना आपल्याला मिळतात.

दीपिका पदुकोणचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ग्लॅमरस तर नाहीच, पण विटंबना झालेला चेहरा घेऊन अख्ख्या सिनेमात ती ज्या पद्धतीने वावरली आहे ते खरंच अप्रतिम. विक्रांत मेस्सी ऑसिड हल्ल्यात शिकार झालेल्या महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी झपाटय़ाने काम करत असतो. त्याने उभा केलेला अँग्री यंग मॅनदेखील अगदी छान. त्या दोघांमधले चुटपुटते प्रसंग इतके खुलले आहेत की, ती दृश्य पाहताना आपल्याला केवळ सुंदर प्रेम दिसतं. तिचा विद्रूप चेहरा किंवा त्याच्याकडे पैसे नसणं असं इतर काही दिसत नाही.

सिनेमाचं गाणं हा सिनेमाचा आणखी एक बळकट भाग आहे. दोनच गाणी आहेत, पण प्रसंगानुरूप त्या गाण्याचा मुखडा पुनः पुन्हा येत राहतो. किंचित उडत्या चालीचं गाणं तो प्रसंग पाहताना आणि त्या गाण्याचा अर्थ समजून घेताना आपल्याला खूपच अस्वस्थ करतं.

तिचा चेहरा वेगळा असलं तरी ती चारचौघांसारखीच आहे हे हळूहळू आपल्यालादेखील उलगडायला लागतं आणि सहानुभूतीच्या पलीकडे आपल्याला तिला नेमकं काय हवंय याची जाणीव व्हायला लागते.

केवळ मंद अशा हसण्याने किंवा साध्या, छोटय़ा संवादातून खूप मोठय़ा गोष्टी सांगायचा या सिनेमाने प्रयत्न केला आहे. यात तिच्यावरचा ऑसिड हल्ला थेट दिसला नसला तरीही ज्या प्रकारे उलगडतो ते अंगावर येतं. शेवटची वीस मिनिटं तर आपण अक्षरशः श्वास रोखून बसतो. सिनेमा बघताना नकळत आपण तिच्या सुखात, तिच्या दुःखात, तिच्या वेदनेत समरस व्हायला लागतो. सिनेमा संपायच्या वेळी थोडेसे सैलावतो आणि अचानक पुन्हा एकदा शेवटच्या दृश्याने स्तब्ध होतो.

हा विषय विकृतीचा असला तरी मेघना गुलजार आणि दीपिका पदुकोण या दोघींनी या सिनेमाला एक वेगळं संवेदनशील परिमाण देऊ केलं आहे. हा सिनेमा म्हणजे एक अनुभव तर आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन विचार करायला लावतो आणि म्हणून हा ‘छपाक’ प्रत्येकाने आवर्जून पाहायला हवा.

  • सिनेमा – छपाक
  • दर्जा – ***
  • निर्माता – फॉक्स स्टुडिओ, दीपिका पदुकोण, गोविंदसिंग संधू, मेघना गुलजार
  • दिग्दर्शक – मेघना गुलजार
  • लेखक – अतिका चौहान, मेघना गुलजार
  • संगीत – शंकर एहसान लॉय
  • कलाकार – दीपिका पदुकोण, विक्रांत मेस्सी, मधुर्जित सिंघी
आपली प्रतिक्रिया द्या