महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपतींचे वंशज एकत्र भेटले

सामना ऑनलाईन । नंदूरबार

महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यांना देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे, या दोन्ही घराण्यांचा एक मोठा इतिहास आहे.उदयपूर येथे १९६१ मध्ये महाराणा प्रतापसिंह यांचे वशंज महाराजा भबुतसिंह यांनी क्वीन एलिझाबेथ आल्या असतांना प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती शहाजीराजे भोसले यांना बोलाविले होते. त्यानंतर तब्बल ५५ वर्षांनी नंदूरबार जिल्हयाचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यामुळे कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले आणि महाराणा प्रतापसिंह यांचे वंशज युवराज लक्ष्यराजसिंह मेवाड एकाच मंचावर एकत्र आले. हा दुर्मिळ योग नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे साधला आणि या दुर्मिळ योगाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

नंदूरबार जिल्हयातील सारंगखेडा येथे एकमुखी दत्ताच्या यात्रेचे निमित्त साधून घोडेबाजाराचे आयोजन केले जाते. या बाजाराला ५०० वर्षांची परंपरा आहे. घोडे खरेदीसाठी वेगवेगळया प्रांतातील अश्वप्रेमी दरवर्षी येत असतात अश्वांच्या विक्रीसाठी प्रसिध्द असणा-या या यात्रोत्सवात दरवर्षी कोटयवधी रूपयांची उलाढाल होत असते. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सारंगखेडा येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून चेतक फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. या फेस्टिव्हलचा पुरस्कार वितरण सोहळा महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला चेतक महोत्सवचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, विक्रांत रावल आदी मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या