‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंतीचा जल्लोष, किल्ले शिवनेरीवर अभूतपूर्व सोहळा

715

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म सोहळय़ासाठी किल्ले शिवनेरीवर अभूतपूर्व गर्दी उसळली. ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा गर्जनांनी अवघा शिवनेरी गड परिसर दुमदुमून गेला. भगवे झेंडे, भगवे फेटे घातलेले तरुण-तरुणींच्या प्रचंड जल्लोषाने गडावरील वातावरण भगवेमय झाले होते. या वेळी पारंपरिक पेहरावात व मराठमोळ्या थाटात महिलाही मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. गडावर दांडपट्टा, तलवारबाजी अशा मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, कसरती आणि ढोल-ताशा या पारंपरिक वाद्ये अशा उत्साही वातावरणात किल्ले शिवनेरी न्हाऊन निघाला.

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवजन्मभूमीला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आले होते. पारंपरिक पद्धतीने शिवजन्मस्थळी शिवकुंजमध्ये जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बालशिवबांच्या पाळण्याची दोरी ओढून शिवरायांना अभिवादन केले. स्थानिक महिलांनी पाळणा म्हणून शिवजन्माचे स्वागत केले. त्यानंतर बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला.

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पवित्र शिवजन्मभूमीवर आपण वेगवेगळ्या पक्षांचे सर्व जण एकत्रित आलो आहोत ते कोणताही पक्ष म्हणून नव्हे तर शिवभक्त म्हणून या ठिकाणी एकत्र आलो आहोत. आपण आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी आलो आहोत. यापूर्वीदेखील मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवजन्मभूमीला वंदन करण्यासाठी येथे आलो होतो.

– मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार ही सर्व पदे असतातच. इतर राज्यांतदेखील ही पदे आहेतच. परंतु इतर राज्यांत आणि आपल्या राज्यात मूलभूत फरक आहे तो म्हणजे ज्या वेळी या देशात हिरवे संकट येत होते आणि या हिरव्या संकटाच्या चिंधडय़ा उडवणारे जे तेज या भूमीत जन्माला आले त्या शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. त्या राज्याचे आम्ही सगळे सेवक आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

– सोहळय़ाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, वन राज्यमंत्री दत्ता भरणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव—पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके आदी उपस्थित होते.

शिवनेरी हे वैभव
शिवनेरी किल्ला आणि परिसरातील विकासकामांचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शिवनेरी कशी आणखी पुढे न्यायची, कशी सजवायची याचे आराखडे तयार आहेत. शिवनेरी हे आपले वैभव आहे, हे आपलं देणं आहे. हे वैभव आपण ज्यांच्यामुळे पाहू शकलो, ते दैवत येथे जन्माला आले म्हणून तसेच जगात महाराजांची कीर्ती असल्याने जगभरातले पर्यटक येथे येतात. शिवरायांनी नेमकं कसं राज्य केलं, हे पाहण्याची उत्सुकता त्यांना असते. हा माझा जुन्नर तालुका आहे. येथे सर्वांत जास्त गड-किल्ले आहेत. तसेच देशातील सर्वांत जास्त लेण्यादेखील माझ्या जुन्नरमध्ये आहेत, असे त्यांनी सांगितले.

माझं सरकार ही प्रत्येकाची भावना
आज मी शिवरायांच्या व जिजामातेच्या चरणी हेच मागणे मागितले आहे. पावलोपावली, प्रत्येक क्षणी आपलं जे काही तेज आहे, प्रेरणा आहे, ते आमच्या पाठीशी सतत राहू द्या आणि हे राज्य सुजलाम्-सुफलाम् होऊ द्या. गोरगरीबांच्या आणि सर्वसामान्यांच्या मनात अशी भावना आली पाहिजे की, हे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी माझं सरकार आहे. आपलं सरकार आहे, ही भावना गोरगरीबांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. नव्हे, ती झाली आहे. म्हणूनच शिवजयंतीनिमित्त एवढी गर्दी प्रचंड प्रमाणात झाली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवरायांना पंतप्रधान मोदींचे नमन
छत्रपती शिवाजी महाराजांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनोखी आदरांजली वाहिली. ‘महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना नमन!,’ असे ट्विट त्यांनी केले. शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होतानाचा फोटोही त्यांनी पोस्ट केला आहे. भारतमातेच्या महान सुपुत्रांपैकी असणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. शौर्य, करुणा आणि उत्तम प्रशासक याचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे जीवनकार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे, असे ट्विट मोदींनी केले आहे.

राजधानीतही शिवजन्मोत्सवाचा उत्साह
शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळा पार पडला. खासदार संभाजी छत्रपती यांनी सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा जोजवला. यानंतर पालखी पूजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनातील शिवरायांच्या अर्धाकृती पुतळय़ाला खासदार संभाजी छत्रपती आणि 10 देशांच्या राजदूतांनी पुष्पहार अर्पून अभिवादन केले. दरम्यान, यावेळी भारत विकास समुहाचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांना खासदार संभाजी छत्रपती यांच्या हस्ते ’छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

– सकाळी संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. खासदार संभाजी छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित खासदार सर्वश्री अरविंद सावंत, हेमंत गोडसे, डॉ. विकास महात्मे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आपली प्रतिक्रिया द्या