छत्रपती शिवाजी महाराज… श्रीमान योगी!!!

chhatrapati shivaji maharaj jayanti

Aniket songire>> अनिकेत रोहिदास सोनगिरे (प्राध्यापक, अशोका महाविद्यालय, नाशिक)

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti पृथ्वीवर असे कित्येक राजे जन्माला येऊन गेले ज्यांच्यात पराक्रम, शौर्य, सामर्थ्य होते. पण काळाच्या पडद्याआड सर्व गडप होऊन गेले. “कालः पिबति तद् रसम्” काळ अत्यंत बलवान आहे. तुम्ही काहीही करा कितीही कीर्ती मिळवा, काळ सर्वांतला रस खेचून घेतो. याउलट छत्रपती शिवराय काळाच्या सीमेला भेदून फक्त राजा म्हणून नाही तर दैवत म्हणून पूजिले जातात. कित्येक परदेशवासीय छत्रपती शिवरायांवर संशोधन करताहेत. त्यांना प्रश्न पडतात, ‘छत्रपती शिवाजी महाराज इतके मोठे कसे? त्यांच्या तलवारीमुळे? त्यांच्या साम्राज्यामुळे?’ केवळ एवढ्यानेच नाही!!! महाराजांकडे तलवारी, फौजफाटा, युद्धसामग्री आणि कमावलेला प्रदेश यापेक्षा त्यांच्याकडे जे ‘चारित्र्य’ होते ते क्वचितच कोण्या राजाकडे असेल.

अक्रोधस्तपसः क्षमा बलवतां धर्मस्य निर्व्याजता |
सर्वेषामपि सर्वकारणमिदं शीलं परं भूषणम् ||

महाराजांच्या जीवनात शीलास अनन्य साधारण महत्त्व होते. जिजाऊंनी दिलेल्या अनन्यसाधारण संस्कारांचाच हा परिणाम आहे. (आज प्रत्येकाला आपल्या घरातील मुलांनी शिवरायासम व्हावे अशी इच्छा असते. परंतु त्यासाठी घरातील वडिलधाऱ्यांना देखील जिजाऊं सारखे गुण अंगीबाणावे लागतील हे आपण विसरत चाललो आहोत!!) स्त्रियांबद्दल शिवरायांची भूमिका उदात्त होती. राज्यात कुणी स्त्रियांचा छळ केला तर त्यांची गय केली जात नव्हती, उलट जबर शिक्षा देखील सुनावण्यात येत होत्या. चारित्र्याचे बळ म्हणूनच काहीही साधन नसतांना महाराजांनी अशक्य ते शक्य करून दाखविले.

घटो जन्मस्थानं मृगपरिजनो भूर्जवसनं,

वने वासः कन्दैरशनमपि दुःस्थं वपुरिदम्।

अगस्त्यः पयोधिं यदकृत कराम्भोजकुहरे,

क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे॥

अशा प्रकारे महाराजांच्या चारित्र्याचे सत्व संपूर्ण काळावर परिणाम दाखवते.

रामदास स्वामी महाराजांचे वर्णन करतांना म्हणतात, ‘निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु, अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी’.

महाराजांकडे जसे सत्व होते तसेच “स्वत्व ” होते. ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र स्वतःचे स्वत्व हरवून बसला होता त्यावेळी तेजपुंज संस्कृतीचा आदर्श घेऊन सोळा वर्षाचा सुकुमार मुलगा रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतो. लोकांच्या दृष्टीने पोरखेळ असेल हा पण समोर काहीही नसताना इतके मोठे ध्येय घेऊन जगणारा हा महापराक्रमी राजा. म्हणूनच “निश्चयाचा महामेरू !!”… पण ह्या निश्याची दिशा, हेतू कोणता? “बहुत जनांसी आधारु!”. महाराजांना “छत्रपती” होण्यासाठी राज्य नको होते तर त्यांना रयतेच्या कल्याणाचे, धर्माच्या दिशेने चालणारे “स्वराज्य” उभे करायचे होते म्हणूनच ‘हे राज्य व्हावे ही ‘श्रीं’ ची इच्छा’ हा निर्धार आणि त्यासाठी अखंड परिश्रम करण्याची तयारी! ती तयारी अशी की, कोणत्याही विजयानंतर तो विजय साजरा करण्याचाही वेळ त्यांनी पुढील मोहिमेतील तयारीत घालवला …म्हणून “अखंड स्थितीचा निर्धारु …!” कुठल्याही विपरीत परिस्थितीत महाराजांचे चरित्र थोडे देखील हलताना दिसत नाही. वृत्तीची अखंडताही त्यांच्या चरित्रात दिसते.

मनस्यन्यद्वचस्यन्यत्कार्ये चाSन्यदुरात्मनाम् |
मनस्येकं वचस्येकं कर्मण्येकं महात्मनाम् ।।

(महान लोक जसे मानतात तसेच बोलतात व तसेच वागतातसुद्धा. नीच माणसे मात्र बोलतात एक व वागतात भलतेच.) महाराजांच्या मन, वाचा आणि कर्म ह्यांच्यात समता दिसते.

“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”

(ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल.)
छत्रपती शिवाजी महाराजांना बंगळुरूहुन पुण्याला पाठवताना शहाजीराजेंनी त्यांच्यासोबत ही राजमुद्रा, भगवा झेंडा आणि विश्वासु माणसं दिली होती. त्यावेळी शिवरायांचं वय होतं अवघं बारा वर्षे. शिवरायांच्या माध्यमातून उभं होणारं स्वराज्य कसं असावं याचा विचार करूनच शहाजीराजेंनी अत्यंत दूरदृष्टीने तिची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदर कार्यावर नजर टाकली असता ते कार्य राजमुद्रेवरील ओळींच्या अंकित राहुनच केल्याचे दिसून येते. स्वराज्य निर्मितीच्या वाटचालीत पदोपदी मार्गदर्शक ठरणारी ही राजमुद्रा समोर ठेवूनच शिवरायांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांच्या सोबतीने स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवला.

राजमुद्रेत उल्लेख केल्याप्रमाणे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे शिवरायांचे स्वराज्य वाढत गेले. प्रसंगी शस्त्र उचलून शिवरायांनी रयतेला तिच्या कल्याणाची, रक्षणाची हमी दिली. रयतेला स्वातंत्र्य दिलं, स्वराज्य दिलं, स्वाभिमान दिला. त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्यामुळे शिवछत्रपती विश्ववंदनीय ठरले. त्यांचे व्यक्तित्व आहेच विश्वव्यापक. स्वतः शहाजीराजेंनीच त्यांच्याकडून विश्वबंधुत्व आणि विश्वकल्याणाची अपेक्षा ठेवून राजमुद्रेत “विश्ववंदिता” या शब्दाचे प्रयोजन केले होते.

महाराजांच्या जीवनाचे चिंतन अशा विविध अंगानी करू शकतो आणि ते केलेच पाहिजे. मिरवणुका निघतातच, झेंडे फडकतातच… पण छत्रपती महाराजांना अभ्यासातून जाणून आपल्या आणि येणाऱ्या पिढीच्या नसानसात ते भिनवले पाहिजेत. अशा प्रयत्नातूनच हा देश पुन्हा चारित्र्यवान होऊ शकतो!

राजे तर अनेक होतात पण “श्रीमान योगी” असलेले छत्रपती शिवराय एकच!! महाराजांस कोटी कोटी वंदन!!!

संपर्कासाठी पत्ता

[email protected]

Mob-8180839035

 

अद्भूत रहस्यांनी भरलेले महान संत ‘परमहंस रामकृष्ण’

आपली प्रतिक्रिया द्या