रोखठोक – राजियांचे चरित्र आख्यान! महाराष्ट्राला नामर्द बनवण्याचे कारस्थान

संजय राऊत << [email protected] >>

वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात भाजपने जो जोश व जोर दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रकरणात दाखवला नाही. उलट छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचे समर्थन केले. ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देऊन जनमताचा उठाव घडविण्याची संधीही विरोधकांनी या प्रश्नी गमावली. शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय?

सध्याचा काळ मोठा कठीण आला आहे. तसे नसते तर महाराष्ट्राच्या भूमीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यास भाजपचे नेते व त्यांचे राज्यपाल धजावले नसते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांना ‘कालबाहय़’ म्हणजे जुने-पुराणे हिरो असे संबोधून वादळ ओढवून घेतले आहे. इकडे राज्यपाल शिवराय जुनेपुराणे झाले असे म्हणतात तर तिकडे भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी राजांनी औरंगजेबास तडजोडीसाठी पाच पत्रे पाठवली म्हणजे माफीच मागितल्याचा स्पह्ट करून महाराष्ट्राची मने दुखावली आहेत. या दोन लोकांनी शिवाजी राजांचा अपमान करूनही महाराष्ट्राचे सरकार तोंड शिवून बसले. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अपमानाच्या विरोधात साधा निषेध केला नाही. उलट राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांचा बचाव केला. असे आक्रित इंग्रजकाळातही घडले नव्हते. म्हणूनच काळ मोठा कठीण आला आहे असेच म्हणावे लागेल. शिवरायांचा अपमान राज्यपालांनी पहिल्यांदाच केला नाही, याआधी तो वारंवार केला आहे. राज्यपाल कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, ही मागणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. अशा राज्यपालांचे व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणे हा राजद्रोहासारखा गुन्हा आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांची केलेली निंदा हा जर राजद्रोहासारखा गुन्हा ठरत असेल तर मग महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांची निंदा हा राजद्रोहच म्हणायला हवा. दोन मुद्दे भाजपच्या नेत्यांनी मांडले, ते म्हणजे शिवाजी महाराज हे जुने झाले व छत्रपती हे नव्या युगाचे ‘नायक’ नाहीत. जे राज्य चारशे वर्षांनंतरही शिवाजी राजांच्या विचाराने चालले ते कालबाहय़ ठरवून भाजप व त्यांच्या लोकांना काय सांगायचे आहे?

असा राजा होणे नाही

छत्रपती शिवाजी राजे हे नूतन सृष्टीचे निर्मातेच होते. शके 1616 पिंवा 1619 मध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी रचलेली, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 14-15 वर्षांनी तयार झालेली ही बखर. सभासद आपल्या बखरीत ‘राजियांचे चरित्र आख्यान’ असे म्हणतात,

‘‘राजा साक्षात केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्वरापर्यंत द्वाही फिरली. देश काबीज केला. अदिलशाही, कुतूबशाही, निजामशाही व मोगलाई या चारी पातशाहय़ा व समुद्रातील बेवीस पातशाहा असे जेरजप्त करून नवेच राज्य साधून मराठा पातशाहा सिंहासनाधीश छत्रपती जाहला. प्रतिइच्छा मरण पावून पैलासास गेला. ये जातीचा कोणी मागे जाहला नाही, पुढे होणार नाही.’’

असा हा राजदरबार

‘शिवाजी’ म्हणजे जाणते राजे. त्यांच्या राज्याची रचना, व्यवस्था, त्यांचे मंत्रिमंडळ हे कालबाहय़ कसे ठरेल? राज्याभिषेकादरम्यान स्वारी रायगडास गेली. चोहोकडे डोंगर, कडय़ा-कपाऱ्या, किल्लेकोट, आसपास बिकट जागा. शत्रूस पोहोचण्यास दुर्गम. गागा भट्टांशी बोलून छत्रपतींनी हीच जागा राजधानीसाठी निवडली. भटजींनी मुहूर्त काढून दिला. राजदरबार कसा असावा हे ठरले, ते असे.

राजसभा – तेथे कचेरी व्हावी.

विवेक सभा – येथे पंडितांनी, पूर्वोत्तर पक्ष करीत असावेत. नाना पुराणांच्या इतिहास कथा श्रवण कराव्यात.

न्याय सभा – येथे न्याय निवाडा व्हावा. (मुख्य न्यायालय)

प्रकट सभा – तेथे गोरगरीबांची फिर्याद ऐकली जावी.

प्रबोधन सभा – त्या ठायी कीर्तनादी शास्त्र्ापुराणे, मथितार्थ श्रवण करावे.

रत्नागार – सभेच्या ठायी नाना प्रकारचे अलंकार, नाना वस्तू, नाना द्रव्ये, कापडासहित अमूल्य जिन्नस मात्र आणवून परीक्षून ठेवावे.

नीती – सभेच्या ठायी परकीय परस्थळीहून आला अगर स्वकीय आला असता त्याची भेट घेऊन देश-विदेश चर्चा करावी. शिक्षाप्रद आज्ञा व्हावी. अधर्मी भाषण होऊ नये. त्याचे नाव नीती सभा. जशी धर्मराजाला मयासुराने मयसभा करून दिली तद्वत महाराजांचा राज्यकारभार व दरबार किल्ल्यावर केला, तो ‘कालबाहय़’ कसा ठरेल?

मस्तकावर पाय ठेवून

शिवाजी राजे यांनी औरंगजेबाच्या मस्तकावर पाय देऊन स्वराज्य स्थापन केले. तसेच ‘औरंगशहाला स्वतःलाच दिल्लीत काsंडीन’ असे सांगितल्याचा रेकॉर्ड इंग्रजी दप्तरात आहे. आज पाकिस्तानला जसे ‘दम’ भरताना आपले राज्यकर्ते हीच नीती अवलंबतात. त्यामुळे परचक्राविरुद्ध लढण्याचा शिवरायांचा विचार जुना नाही. संतांना परचक्राविरुद्ध लढण्यासाठी जो ‘अवतार’ पाहिजे होता तोच शिवछत्रपतींनी पुरवला.

शिवचरित्राचे खरे सार काढले तर त्यातून दोन प्रमुख सूत्रे बाहेर येतात. एक परचक्राचा हरतऱहेने विरोध करून स्वराज्य स्थापायचे आणि दुसरे स्वराज्याचा पाया मुख्यतः कष्टाळू जनतेवर आधारून तिला अनुरूप अशा सुधारणा करून स्वराज्य स्थापन करायचे. हिंदुस्थानातील वतनदार-जहागीरदारांनी परचक्राला साथ दिली व जनतेला छळले. म्हणून शिवरायांनी मराठी राज्य स्थापताच मोकासे व जहागिऱ्या रद्द केल्या आणि सैन्यानेसुद्धा गावांमधून काही वस्तू घेतल्यास तिची पिंमत दिली पाहिजे, असा हुकूम केला. पिकांवरचा सारा ‘मक्ता’ देऊन (अडते-मोनॉपॉली) वसूल करण्याची पद्धत बंद केली. सैरावैरा फिरणारे कातकरी, बेरड जमातींना किल्ल्यावर पहाऱ्याच्या नेमणुका दिल्या व त्यांना शेते देऊन त्यांच्या वसाहती केल्या. त्यामुळे त्यांना प्रामाणिकपणे आयुष्य घालविण्याची संधी व साधने मिळाली. बेकारी नष्ट झाली. बेकारी नष्ट करणे व त्यासाठी त्या काळात योजना राबवणे हा विचार जुना-पुराणा कसा होऊ शकतो? मोदी पंतप्रधान म्हणून बेकारांना नोकऱ्या देत आहेत व शिवरायांनी वतनदाऱ्या नष्ट केल्या, तशी सरदार वल्लभभाई पटेलांनी संस्थाने नष्ट केली ते काय शिवरायांचे विचार कालबाहय़ झाले म्हणून? आज मराठी भाषा व अस्मितेचा विचार बोलला जातो. मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून लढे दिले जातात, पण राज्याभिषेक होताच छत्रपती शिवरायांनी ताबडतोब मराठी भाषा राज्य-भाषाकोश तयार करून परकीय भाषेची महाराष्ट्रातून हकालपट्टी केली होती, हे लक्षात घेतले पाहिजे.

फारशी भाषेवाचून माझे कायदे-कोर्ट चालणार नाहीत अशी अडचण त्यांना भासली नाही. मराठी भाषा आणि संस्कृतीचा विकास हे तेव्हा शिवाजी महाराजांचे ध्येय होते, तसे आज आपल्या सगळय़ांचे आहे.

दुष्मनांशी लढण्यासाठी ‘आरमार’ म्हणजे नौदलाची स्थापना करणारे शिवाजी महाराज हे पहिले. त्यांनी समुद्रात किल्ले उभारले व नौदलाची निर्मिती केली. याच नौदलाची संकल्पना पुढे गेली. त्यामुळे शिवाजी महाराज कालबाहय़ नाहीत. नौदलाचा नवा ध्वज पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवरायांना समर्पित केला. ‘‘भारतीय नौदलाच्या झेंडय़ावर आतापर्यंत गुलामगिरीचे निशाण होते, पण आता इतिहास बदलून टाकणारे काम आपण केलेय. आज भारताने गुलामगिरीचे ओझे झेंडय़ावरून पुसून टाकले आहे. आजपासून (2 सप्टेंबर 2022) भारतीय नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे. तो झेंडा आपण नौदलाचे प्रणेते छत्रपती शिवरायांना समर्पित करीत आहोत.’’ पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली, ती काय शिवाजी महाराज कालबाहय़, जुने-पुराणे झाले म्हणून?

ते आजचे नायक

शिवाजी महाराज ‘नायक’ नसते तर देशाच्या स्वातंत्र्य लढय़ास प्रेरणा मिळावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचा घाट घातलाच नसता.  टिळकांनी गणपती व शिवराय घरातून मांडवात आणले. शिवाजी-भवानीच्या नावानेच संयुक्त महाराष्ट्राचा लढादेखील पेटवला व जिंकला गेला. मुंबई महाराष्ट्रास मिळाली. शिवसेनेसारखे ज्वलंत, राष्ट्रीय बाण्याचे संघटन तर शिवाजी राजांच्या प्रेरणेतूनच उभे राहिले. शिवराय कालबाहय़ झाले असते तर त्यांचे नाव कशाला कोणी घेतले असते?

शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना संरक्षण दिले म्हणून ते राजांभोवती – स्वराज्याभोवती जमा झाले. शेतकऱ्यांच्या संरक्षणाचीच व हक्कांचीच भाषा आजही केली जाते.

महाराष्ट्रात शिवराय हे श्रद्धास्थान आहे व जगासाठी ते आदर्श वीरपुरुष आहेत. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य फक्त लोककल्याणासाठी होते. त्याच लोककल्याणाचा विचार सर्वच राज्यकर्त्यांनी पुढे नेला. शिवाजी राजांविषयी चुकीची विधाने पंडित नेहरू ते मोरारजी देसाईंनी केली. तेव्हा खवळलेल्या महाराष्ट्राने त्यांना माफी मागायला भाग पडले. तोच महाराष्ट्र आज थंड, लोळागोळा होऊन पडला आहे. मागे एका प्रकरणात छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा अपमान झाला म्हणून संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना ‘सांगली बंद’ केले, पण आज छत्रपती शिवरायांचा भाजपकृत अपमान होऊनही ते गप्प आहेत. या प्रश्नी सर्व शिवप्रेमी संस्था व संघटनांनी एकत्र येऊन ‘महाराष्ट्र बंद’चीच हाक द्यायला हवी. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यावर इस्लामी व अरब राष्ट्रांनी निषेध करताच भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, पण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांचे मात्र समर्थन केले जाते! बदनामी करणाऱ्यांचा केसही वाकडा झाला नाही. ते त्यांच्या पक्षात आणि पदावर कायम आहेत!

महाराष्ट्राला नामर्द बनवण्याचे कारस्थान विषप्रयोगाप्रमाणे तडीस जात आहे!

उसळून उठण्याची महाराष्ट्राची क्षमता नष्ट होत आहे!

 @rautsanjay61