महाराजांच्या ‘मॉर्फ’ केलेल्या व्हिडीओ विरोधात गृहमंत्र्यांची कडक पावलं, यूट्यूबवरून हटवण्यासाठी तक्रार

1171
anil-deshmukh-new

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो वापरून व्हिडीओ मॉर्फ केल्याची तक्रार प्राप्त झाल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ‘यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून आम्ही तातडीनं यूट्यूबकडे तक्रार करणार आहोत’, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच अशा प्रकारे थोरांचं विडंबन करून कॅम्पेन करणे चूक असल्याचे म्हणत देशमुख यांनी भाजपचा निषेध केला.

दिल्ली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर मोदींचा तर नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा फोटो असलेला व्हिडीओ पॉलिटीकल कीडा नावाच्या हँडलवरून टाकण्यात आला होता. यानंतर महाराष्ट्रातून संताप्त प्रतिक्रिया आल्या. भाजपच्या अधिकृत हँडलवरून हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला नसला तरी या व्हिडीओतून भाजपचा प्रचार करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सर्वप्रथम यावर आवाज उठवला. शिवसेनेला लक्ष्य करणारे आता कुठे आहेत, असा सवाल देखील त्यांनी वेळी उपस्थित केला.

‘मॉर्फ’ व्हिडीओवर छत्रपती संभाजीराजे संतापले असून त्यांनी तत्काळ कारवाईची मागणी त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या