शिवरायांचा एकेरी उल्लेख करणारी दिनदर्शिका ‘एनआरएमयू’ने मागे घेतली, रेल कामगार सेनेचा जोरदार दणका

chhatrapati shivaji maharaj jayanti

नॅशनल रेल मजदूर युनियनने (एनआरएमयू) छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्या दिनदर्शिकेमध्ये एकेरी उल्लेख केल्यामुळे रेल कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वे डीआरएम कार्यालयावर काल जोरदार धडक देत ही वादग्रस्त दिनदर्शिका त्वरित मागे घेण्याची मागणी करीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यावर धाबे दणाणलेल्या ‘एनआरएमयू’ संघटनेने अखेर माफीनामा सादर करीत ही दिनदर्शिका मागे घेतली आहे.

नॅशनल रेल मजदूर युनियनच्या पॅलेंडरवर शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याने रेल्वे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण होते. त्यातच या पॅलेंडरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या जागी ‘बर्थडे’ असा अवमानकारक उल्लेख केला असल्याने रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या ‘डीआरएम’ कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. दैनिक ‘सामना’ने यासंदर्भात वृत्तही प्रसिद्ध केले होते. या बातमीची तातडीने दखल घेत ‘एनआरएमयू’चे सरचिटणीस वेणुगोपाल नायर यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तातडीने बोलावून घेतले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आला. तसेच ज्या दिनदर्शिकांची छपाई केली आहे, त्या त्वरीत मागे घेत सर्व महापुरुषांचा आदर आणि योग्य उल्लेख केलेल्या नव्या दिनदर्शिकांचे छपाई करण्याचे त्यांच्याकडून मान्य करण्यात आले असल्याचे रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव, कार्याध्यक्ष संजय जोशी, संयुक्त सरचिटणीस नरेन्द्र शिंदे यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या