जय भवानी जय शिवाजीच्या गजरात किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न

520

हिंदवी स्वराज्य संस्थापक,युगपुरुष आणि सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४७ वा शिवराज्याभिषेक सोहळा आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर साधेपणाने आणि मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत,अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि आदल्या दिवशी निसर्ग चक्रीवादळाचा प्रकोप असतानाही लोकोत्सव बनलेल्या या पारंपरिक सोहळ्यात खंड पडला नाही. यंदा रायगडावर संभाव्य लाखो शिवप्रेमींची मांदियाळी टाळुन ” छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,शिवराज्याभिषेक घराघरात ” या संकल्पनेतुन सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीच्या वतीने करवीर संस्थानचे युवराज व खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, युवराज्ञी संयोगिता राजे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी किल्ले रायगडावर दि.५ व ६ जून रोजी हा सोहळा साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनाच्या संकटामुळे मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने समितीचे मोजकेच पदाधिकारी व कार्यकर्ते काल शुक्रवारी पहाटे रायगडला रवाना झाले. पण आदल्या दिवशी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा संपुर्ण रायगड परिसरालाही बसल्याने,या समितीचा रायगडवरुन संपर्क तुटला होता. अशा ही परिस्थितीत परंपरेनुसार सायंकाळी गडावरील गडकऱ्यांच्या उपस्थितीत विधीवत गडपुजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात झाली.तत्पुर्वी राजसदरेवरील मेघडंबरीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती सभोवती आकर्षक सजावट करण्यात आली.रात्री गडदेवता शिरकाई देवीसमोर गोंधळ घालण्यात आला.होळीच्या माळावर शिवकालीन तलवारबाजी,दांडपट्टा अशा थरारक मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांतुन शिवरायांना मानवंदना देण्यात आली.

तर सकाळी युवराज छत्रपती संभाजीराजे आणि यौवराज छत्रपती शहाजीराजे यांच्या हस्ते रायगडावरील नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर भव्य भगवा ध्वज फडकवुन,आज सोहळ्याच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली.यानंतर युवराज संभाजीराजे व यौवराज शहाजीराजे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मुर्तीसह राजसदरेवर आगमन झाले.त्यांच्या हस्ते उत्सव मुर्तीवर वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक घालण्यात आला.पाठोपाठ मेघडंबरीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून,मानाचा मुजरा करून,सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला.यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी ” छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी,तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी वातावरण शिवमय केले.

दरम्यान यावेळी काही कोरोना योद्ध्यांचा प्रतिकात्मक सन्मानही करण्यात आला.यानंतर शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीसह युवराज संभाजीराजे यांनी जगदीश्वर मंदिराकडे प्रस्थान करुन,शंभुमहादेवाचे दर्शन घेतले.तसेच येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळास अभिवादन करुन,या सोहळ्याची सांगता केली.

आपली प्रतिक्रिया द्या