छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करणार नाही- संजय राऊत

1335
sanjay-raut-press-conferenc

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीं तर नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा चेहरा मॉर्फकरून एक व्हिडीओ ट्विटरवरून व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमी महाराष्ट्रासह देशातील नेटकऱ्यांनी भाजपविरोधात संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करणार नाही अशी खणखणीत प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिटिकल कीडा’ या ट्विटर हँडलवरून ‘तान्हाजी’ या चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करण्यात आले आहे. भाजप नेते आणि समर्थकांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी मोदींची तुलना करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याविरोधात महाराष्ट्रातील जनतेने आवाज उठवून देखील हे प्रकार थांबवण्यात आलेले नाहीत. भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात जय भगवान गोयल यांनी लिहलेले ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्याला शिवसेनेसह महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी जनतेने कडाडून विरोध केला. यामुळे अखेर भाजपला हे पुस्तक मागे घेत असल्याचे जाहीर करावे लागले होते. या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी गुपचूप बसलेल्या काही संघटनांनी यानंतर शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी मोदींना दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेते खासदार यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेला लक्ष्य करू पाहणाऱ्या संघटना आता काय प्रतिक्रिया देणार, त्यांच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत, असेही संजय राऊत म्हणाले. शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या, असा खोचक सवालही राऊत यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या