
छत्तीसगडमध्ये एका सरकारी अधिकाऱ्याने धरणात पडलेला मोबाईल शोधण्यासाठी थेट 21 लाख लिटर पाणी उपसल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्तीसगडमधील कांकेरमध्ये हा प्रकार घडला असून अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. या पाण्यामुळे तब्बल 1,500 एकर जमिनीला पाणी मिळू शकले असते.
कांकेर जिल्ह्यातील पखंजूर येथील खेरकट्टा परळकोट जलाशयामध्ये अधिकाऱ्याचा फोन पडला. प्रथम स्थानिक लोक मोबाईल शोधण्यासाठी पाण्यात उतरले. त्यानंतरही फोन न सापडल्याने 3 दिवस 2 डिझेल पंप लावून जलाशयातील पाणी रिकामे करण्यात आले आणि फोन बाहेर काढण्यात आला. उत्तर बस्तर कांकेरच्या जिल्हाधिकारी प्रियंका शुक्ला यांनी अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
धरणातील पाणी उपसण्यासाठी अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांनी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता आपल्या पदाचा गैरवापर करून लाखो लिटर पाण्याची कडक उन्हात नासाडी केली. हे त्यांचे असभ्य वर्तन असून ते स्वीकारले जाऊ शकत नाही. अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांना छत्तीसगड नागरी सेवा नियमांच्या विरोधात काम केल्याबद्दल तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.