छत्तीसगडमध्ये ‘हे’ चार चेहरे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

13

सामना ऑनलाईन । रायपूर

छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत बहुमत मिळवले आहे. त्यामुळे चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवण्याचे रमणसिंह यांचे स्वप्न भंगले आहे. निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवले असले, तरी मुख्यमंत्री कोण असा प्रश्न उभा राहिला आहे. या पदासाठी काँग्रेसमध्ये अनेक दावेदार आहेत. मात्र, भूपेश बघेल, टी.एस. सिंहदेव, ताम्रध्वज साहू आणि डॉ.चरणदास महंत यांची नावे आघाडीवर आहेत.

भूपेश बघेल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्षाला विजय मिळवून देण्यात बघेल यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांनी पक्षाला बहुमत मिळवून दिल्याने पक्षाकडून त्यांना बक्षीसाची अपेक्षा असणारच. तसेच सीडी प्रकरणात त्यांचे नाव आल्यानंतरही त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली होती. बघेल यांच्याकडे ओबीसी नेता म्हणून बघितले जाते. छत्तीसगढमध्ये ओबीसींची लोकसंख्या 36 टक्के आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसींना आकर्षित करण्यासाठी त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे.

टी. एस. सिंहदेव 2013 पासून छत्तीसगड विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. अंबिकापूर मतदारसंघातून विजयी झालेले सिंहदेवही मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. या निवडणुकीत जाहीरनामा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी जाहीरनाम्याद्वारे समाजातील सर्व नागरिकांपर्यंत पोहचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी सर्वसमावेशक घोषणापत्र तयार केले. त्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ते आघाडीवर आहेत.

ताम्रध्वज साहू काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे इतर मागासवर्गीय समाजात त्यांची चांगली ओळख आहे. 2014 मध्ये मोदी लाटेतही ते निवडून आले होते. छत्तीसगढमध्ये तिकीट वाटपानंतर काँग्रसमधील बंड आणि असंतुष्टांना थोपवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे त्यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

डॉ. चरणदास महंत सक्ती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. मध्य प्रदेश सरकारमध्ये ते गृहमंत्री होते. तसेच युपीएच्या दुसऱ्या कार्यकाळात ते राज्यमंत्री होते. पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांनी डॉ. चरणदास यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार जाहीर केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या