परप्रांतीयांविरोधात चिंचोटी ग्रामस्थांचा गेल कंपनीवर मोर्चा

चिंचोटी येथील एका तरुणीवर तीन परप्रांतीयांनी विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हे कामगार गेल कंपनीत एका ठेकेदाराकडे काम करत असल्याचे उघड झाल्यानंतर ग्रामस्थांनी गेल कंपनीवर मोर्चा काढून परप्रांतीयांना हटकण्याची मागणी केली. शुक्रवारी सायंकाळी तीन परप्रांतीय कामगारांनी एका तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना गावात कळल्यावर ग्रामस्थांनी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात दिले. यांनतर पोलिसांनी फरार दोन आरोपींनाही अटक केली. अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणारे तीनही आरोपी हे परप्रांतीय असून ते गेल कंपनीत ठेकेदाराच्या हाताखाली काम करतात. परप्रांतीयांमुळे मुलींची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे आक्रमक ग्रामस्थांनी ‘भैया हटाव, बेटी बचाव’ अशा घोषणा देत गेल कंपनीसमोर आंदोलन केले.