पार्सलमधील चिकन खाताच डिलिव्हरी बॉयच्या मुलाचा मृत्यू, पोलीस तपासात उघडकीस आला भलताच प्रकार

इंडोनेशियात घडलेल्या एका घटनेचे रोज नवनवे पैलू उजेडात येत असल्याने तिथे हे प्रकरण गाजायला लागलं आहे. बंदीमन हा एक पार्सल पोहचवणारा कर्मचारी आहे. 25 एप्रिल रोजी त्याला एक पार्सल पोहचवण्याचं काम मिळालं होतं. पार्सलमधील गोष्ट ज्याच्याकडे पोहचवायची होती, त्याने ते न स्वीकारल्याने बंदीमन पार्सल घरी घेऊन आला होता. पार्सलमध्ये चिकन होतं जे बंदीमनचा मुलगा आणि बायको या दोघांनी इफ्तारमध्ये खायचं ठरवलं होतं. हे चिकन खाल्ल्यानंतर 10 वर्षांच्या नबा फैज प्रस्तेयाला आणि बंदीमनच्या बायकोला उलट्या व्हायला लागल्या. दोघांची प्रकृती बिघडायला लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात दोघांवर उपचार करण्यात आले, मात्र डॉक्टर नबाचा जीव वाचवू शकले नाहीत.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला तेव्हा भलताच प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी बंदीमनला पार्सल कोणाकडून घेतलं होतं आणि कोणासाठी होतं याची माहिती घेतली. हे पार्सल नानी एप्रिललियानी नूरजमान (25 वर्षे) नावाच्या महिलेने पाठवलं होतं. हे पार्सल तिने योग्यकार्ता भागातील बांतूलचा रहिवासी असलेल्या टॉमीसाठी पाठवलं होतं. जेव्हा पार्सल टॉमीच्या घरी पोहोचलं तेव्हा तो घरी नव्हता. त्याच्या बायकोने दरवाजा उघडला होता. काहीही मागवलेले नसताना हे पार्सल घरी आल्याने टॉमीच्या बायकोने ते घेतले नाही. टॉमीच्या बायकोने बंदीमनला सांगितले की रमजान सुरू असल्याने पार्सलमधली गोष्ट तूच उघड आणि इफ्तारसाठी खा. नाईलाज झाल्याने बंदीमनने पार्सल घरी नेले आणि त्यातले चिकन त्याच्या बायको, मुलाने खाल्ले. पोलीस तपासात असं कळालं आहे की नानी आणि टॉमीचे प्रेमसंबंध होते, मात्र टॉमीने भलत्याच तरुणीशी लग्न केल्याने नानी संतापली होती. त्याला ठार मारण्यासाठी तिने चिकन तयार करून त्यावर सायनाईड शिंपडलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या