राज्यपालांना फटकारले म्हणून भाजपकडून सरन्यायाधीश ट्रोल, विरोधी पक्षांचे राष्ट्रपतींना पत्र; कारवाईची मागणी

भाजप समर्थकांकडून नेहमीच सोशल मिडियावर विरोधी पक्षांच्या नेत्यांना अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह भाषेत ट्रोल केले जाते. परंतु आता भाजप समर्थकांची मजल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना ट्रोल करण्यापर्यंत गेली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुनावणीवेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना फटकारले होते. त्यामुळे सरन्यायाधीशांना ट्रोल केले जात आहे. याबाबत विरोधी पक्षांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून ट्रोलर्सवर कारवाईची मागणी केली.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय घटनापीठापुढे झाली. सुनावणीदरम्यान तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भुमिकेबाबत सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी जोरदार फटकारले होते. सुनावणी नुकतीच संपली असून, सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांच्या (भाजप आणि शिंदे गट) समर्थकांकडून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांना ट्रोलिंग केले जात आहे.

पत्रामध्ये या नेत्यांची स्वाक्षरी
काँग्रेसचे खासदार विवेक तंखा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रामध्ये विरोधी पक्षाच्या 13 नेत्यांची स्वाक्षरी आहे. विवेक तंखा यांच्यासह काँग्रेसचे दिग्विजय सिंह, शक्तीसिंह गोहिल, प्रमोद तिवारी, अमी याज्ञिक, रणजित रंजन, इम्रान प्रतापगढी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, आम आदमी पक्षाचे राघव चढा, सपाचे नेते रामगोपाल यादव, जया बच्चन यांचा समावेश आहे. तसेच विवेक तंखा यांनी अॅटर्नी जनरल आर. वेंकटरामाणी यांनाही पत्र लिहले आहे.