सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांचा मराठीतून संवाद

देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा मराठी बाणा सर्वोच्च न्यायालयात पाहायला मिळाला. एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी पुण्यातील वकील इंग्रजी बोलताना अडखळत असल्याचे पाहून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांच्याशी मराठीतून संवाद साधला. ही बाब न्यायालयात उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली. सोशल मीडियातूनही याला उत्स्फूर्त दाद मिळाली.

सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी एका प्रकरणाची सुनावणी लक्षवेधी ठरली. संबंधित याचिकाकर्त्याचे वकील पुण्यातील होते. न्यायालयाची भाषा इंग्रजी असल्याने सुनावणीदरम्यान ते इंग्रजीतून बोलत होते. मात्र बोलताना ते अडखळत असल्याचे पाहून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीच त्यांना थांबवले व त्यांच्याशी मराठीतून संवाद सुरू केला. ‘तुम्हाला मराठी येते का?’, अशी विचारणा करत आज तुमचा अर्ज लिस्टेड आहे, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. सरन्यायाधीश मराठीत बोलताहेत म्हटल्यावर त्या वकिलांनाही हायसे वाटले व त्यांनी आपले म्हणणे मराठीतून मांडले.

न्यायमूर्ती गोगोई यांनी माझ्या प्रकरणात बेकायदेशीर आदेश दिल्याचे याचिकाकर्त्याच्या वतीने वकिलांनी सांगितले. त्यावर ‘एक मिनिट थांबा, मला रजिस्ट्रीला विचारू द्या,’ असे सरन्यायाधीश म्हणाले. तेव्हा ‘हे रजिस्ट्रीच्या चुकीमुळे झाले होते’, असे वकील म्हणाले असता सरन्यायाधीशांनी खटल्याच्या फाइलची प्रत मागितली.