वादानंतर सरन्यायाधीशांनी केले कामाचे वाटप

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयातील कामाच्या वाटपावरून कलह निर्माण झाल्यानंतर आता सरन्यायाधीशांनी कामाचे वाटप जाहीर केले आहे. नवे रोस्टर ५ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. नव्या वाटपानुसार सर्वोच्च न्यायालयाकडे येणाऱ्या सर्व जनहित याचिकांची सुनावणी सरन्यायाधीशांचे खंडपीठ करेल.

सर्वोच्च न्यायालयातील कामाच्या वाटपावरून न्या.जे. चलमेश्वर, न्या.रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या.कुरियन जोसेफ यांनी थेट माध्यमांसमोर येऊन जाहीर नाराजी व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयात सारे काही आलबेल नसल्याचा आरोपही या चार न्यायमूर्तींनी केला होता. त्यानंतर केंद्र सरकारची पळापळ झाली. सरन्यायाधीश व बंडखोर न्यायमूर्तींमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न झाले. त्याचाच एक भाग म्हणून आज सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी रोस्टर जाहीर केले. हे रोस्टर श्रेणीनुसार ठरवण्यात आले आहे.

असे आहे कामाचे वाटप
जनहित याचिका, निवडणूक याचिका, न्यायालय अवमान, सामाजिक न्याय तसेच गुन्हेगारी विषयांसहित इतर याचिकांवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे खंडपीठ सुनावणी करेल.
सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमाकांचे न्यायमूर्ती जे. चलमेश्वर यांच्यासमोर गुन्हेगारी, श्रम, कर, भूमी अधिग्रहण, दिवाणी, आर्थिक व्यवहार, न्यायिक अधिकाऱ्यांशी संबंधित खटले, भूमी अधिनियम, सागरी कायद्याचे खटले चालतील.
तिसऱ्या क्रमाकांचे न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासमोर न्यायालय अवमान, धार्मिक प्रकरणे, पर्सनल लॉ, बँकिंग, सरकारी ठेके, गुन्हेगारी, श्रम, कर, भूमी अधिग्रहण, दिवाणी, आर्थिक, सागरी कायदा आदी खटले चालतील.
चौथ्या क्रमांकाचे न्यायमूर्ती मदन लोकूर यांच्यासमोर वन संरक्षण, भूमी, पाणी, निमलष्करी दले, लष्कर तसेच धार्मिक खटले चालतील.
पाचव्या क्रमांकाचे न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्यासमोर श्रम, भाडे कायदा, कुटुंब तसेच पर्सनल लॉ आणि धार्मिक खटले चालतील.

आपली प्रतिक्रिया द्या