राज्यातील कायदा-सुव्यवस्था उत्तम!

37

सामना ऑनलाईन । नागपूर

महाराष्ट्रातील गुन्हेगारीमध्ये वर्षानुवर्षे घटच होत आहे. विरोधकांकडून महाराष्ट्र गुह्यांच्या प्रमाणात देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जात असले तरी ते साफ चूक आहे. विरोधक महाराष्ट्र आणि नागपूरला उगाचच बदानाम करीत आहेत. दिल्लीचा क्रमांक पहिला असला तरी महाराष्ट्र गुह्यांत १७ व्या स्थानावर असून राज्याची कायदा-सुव्यवस्था अत्यंत उत्तम आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असले तरी मुन्ना यादवची कामगार मंडळावर कशी नियुक्ती होते, या प्रश्नावर अधिक खुलासा करण्यास मुख्यमंत्र्यांनी मात्र बगल दिली.

विरोधकांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी घसरल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातला क्राइम कमी झालाय. हा क्राइम रेट देशापेक्षा कमी आहे. महाराष्ट्र कुठेही देशाच्या जास्त क्राइम असलेल्या राज्यांत नाही. गुन्हे घडतात, पण गुन्हेगारांना किती शिक्षा होते हे महत्त्वाचे. रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढल्याने गुन्हेगारांच्या शिक्षेचे प्रमाण ३४.८ टक्क्यांपर्यंत गेल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नागपूरला बदनाम करू नका

नागपूरला विरोधकांकडून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र ते योग्य नाही. नागपूरमधील पाच पोलीस ठाण्यांना शहरी भागाशी जोडण्याचे काम केल्यानेच येथील गुह्यांच्या नोंदीची संख्या वाढली आहे. त्यामुळेच ‘एनसीआरबी’च्या रिपोर्टमध्ये दुसऱया क्रमांकावर आले आहे. नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण चुकीच्या माहितीआधारे नागपूर शहराला बदनाम केले तर ते योग्य नाही. अन्य शहरांपेक्षा नागपूरमध्ये कमी गुन्हे घडताहेत. तेव्हा नागपूरला टार्गेट करू नये. यामुळे इथे जे गुंतवणूक करू इच्छितात ते येणार नाहीत. त्यामुळे या शहराचे आणि राज्याचे नुकसान होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नागपूरमध्ये मुन्ना तर सांगलीत सचिन!

नागपूरमधील खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाप्रकरणी फरारी असलेल्या मुन्ना यादव याची बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली. फरारी मुन्ना यादव नागपूरमध्ये असूनही त्याला अटक होत नसल्याबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपावर अधिक खुलासा केला नाही. मुन्ना यादव यांच्या घरागुती वादाचे हे प्रकरण आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याला अटक करतील असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र याचवेळी जयंत पाटील यांच्यावर घसरत मुख्यमंत्र्यांनी प्रश्नालाच बगल दिली. मुन्ना यादव याच्यावर अन्य कोणतेही गुन्हे नाहीत. सांगलीतील सचिन सावंत याच्यावर अनेक गुन्हे असूनही ते तुमचा मतदारसंघ सांभाळत असल्याची आठवण करून दिली. मुन्ना यादव याच्या कामगार मंडळावरील नियुक्तीबाबत मात्र मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत.

नितीन आगेप्रकरणी फुटीर साक्षीदारांवर कारवाई करणार!

नितीन आगे हत्या प्रकरणातील सर्व आरोपी साक्षीदार फुटल्याने निर्दोष सुटले आहेत. याप्रकरणी सरकार वरच्या न्यायालयात अपील तर करेलच, पण नितीन आगे याच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन त्यांना हवा तो वकीलही नेमेल. तसेच जे साक्षीदार फुटले आहेत त्यांच्यावरही कारकाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. अश्विनी बिद्रे या महिला पोलीस निरीक्षकाच्या जीविताचे बरेवाईट केले गेले असाके असा निष्कर्ष प्राथमिक तपासात व्यक्त केला गेला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासह ज्ञानदेव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. तसेच सांगली येथील अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱयांना पोलीस दलातून कायमचे बडतर्फ केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गुह्यांच्या प्रमाणात १३.४९ टक्के घट, बलात्काराचे प्रमाण ३.६ टक्के घटले, दरोडे २.४६ टक्क्यांनी घटले, दंगल गुह्यांचे प्रमाण ३.१५ टक्क्यांनी तर सोनसाखळी ८.९० टक्क्यांनी घटल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या