ऑक्सिजन मास्कअभावी रुग्णवाहिकेतच रुग्णाचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांच्या दरे गावाशेजारील तापोळ्याची घटना

सातारा जिह्यात मुख्यमंत्र्यांच्या दरे गावाजवळील तापोळा गावात रुग्णवाहिकेत ऑक्सिजन मास्कअभावी एका रुग्णाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. या घटनेने दुर्गम भागातील आरोग्य सेवाच सलाईनवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोयना विभागातील तापोळा येथील  108 रुग्णवाहिकेत हा प्रकार घडला आहे. मारुती नामदेव सपकाळ (वय 65) असे या मृताचे नाव आहे.

याबाबतची तक्रार वेळापूर गावचे सरपंच राम सपकाळ, तापोळा गावचे सरपंच आनंदा धनावडे यांनी दिली आहे. या दोघांनी संबंधित 108 रुग्णवाहिकेच्या ठेकेदाराला याचा जाब विचारला. मात्र, त्या ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने 108 रुग्णवाहिकेचा भोंगळ कारभार आता चव्हाटय़ावर आला आहे. मयत मारुती सपकाळ हे शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख दिवंगत हरिभाऊ सपकाळ यांचे बंधू असून, त्यांचे गाव अहिरे वानवली आहे. त्यांना 108 रुग्णवाहिकेमधून महाबळेश्वर येथे उपचारासाठी नेण्यात येत होते. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.

या रुग्णवाहिकेमध्ये असणाऱ्या सुविधा सुस्थितीत नसल्याने रुग्णांना त्याचा उपयोग होत नाही. या विभागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून 108 रुग्णवाहिकेची सुविधा मिळत नसल्याने प्राण गमावण्याची वेळ येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तापोळा येथे नुकतीच भेट दिली होती. येथे विशेष वैद्यकीय कक्षही सुरू करण्यात आले होते. मात्र, हे वैद्यकीय कक्ष सुरू करत असताना 108 रुग्णवाहिकेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या भागातील 108 रुग्णवाहिकेची दुरवस्था झाली असून, यात असणाऱ्या सुविधा उपयुक्त नाहीत, हे या व्यक्तीच्या मृत्यूवरून सिद्ध झालेच आहे, असा आरोप दोन्ही सरपंचांनी केला आहे.

या विभागासाठी कोटय़वधीचा निधी मिळूनही तापोळा केंद्राची स्थिती बदलली नाही. त्यासाठी त्यांनी विशेष बैठकही घेतली होती. मात्र, त्यामध्ये अजून तरी प्रशासनाकडून काही उपाययोजना झाल्याचे दिसून येत नाही.

रुग्णवाहिकेची अवस्था दयनीय

108 रुग्णवाहिकेची दुरवस्था झाली असून, यात मॉनिटर सुरू नाही, मास्क नाही, एसी खराब आहे. व्हॅनची अवस्थाही वाईट आहे. या व्हॅनमधील सक्शन मशिन बंद आहे. तसेच ही व्हॅन कधीही वेळेवर उपचारासाठी पोहोचत नाही. पंक्चर झाली किंवा अन्य काही बिघाड झाला, तर त्याची दुरुस्ती करण्यासाठी रिपोर्टिंग करून 15 दिवस झाले तरी याचा सुपरवायझर याकडे लक्ष देत नाही, अशी परिस्थिती आहे, असे सरपंच राम सपकाळ व आनंदा धनावडे यांनी सांगितले. हा सुपरवायझर उद्धट उत्तरे देत असल्याचा आरोपही सपकाळ व धनावडे यांनी केला.