अतिवृष्टीने बरबाद झालेल्या नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत मुख्यमंत्र्यांचे सत्कार सोहळे!

>> विजय जोशी/सचिन कावडे

अतिवृष्टीने संपूर्ण मराठवाड्याच्या शेतशिवाराचा चिखल झाला असून नांदेड, हिंगोली जिल्ह्याला याचा जबर फटका बसला आहे. केळी, हळद, सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामच हातचा गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर दाटला आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांचे कैवारी असल्याची हाकाटी पिटणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र या शेतकयांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ नाही. कोडगेपणाची हद्द झाली असून, अतिवृष्टीने बरबाद झालेल्या नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत मुख्यमंत्री शिंदे हे आमदार, खासदारांच्या घरी भेटी देणार असून, सत्काराचे हारतुरे स्वीकारणार आहेत!

महिनाभर उशिराने आलेल्या पावसाने मराठवाड्यात हाहाकार उडवला. जुलै महिन्यातच पावसाने रौद्ररूप दाखवले. संततधार पावसामुळे मराठवाडयातील शिवाराचा जलाशय झाला. मराठवाडयाच्या आठही जिल यंदा सोयाबीनची कैकपटीने जास्त पेरणी झाली होती. अतिपावसामुळे सोयाबीन, कापूस शेतकऱ्यांच्या हातून गेले. तूर, उडीद, भुईमूग, मूग आदी पिके शिवारात दलदल झाल्याने सडली. खरीप हंगाम हातून गेल्याने शेतकऱ्यांवर आसवे ढाळण्याची वेळ आली. अतिवृष्टीचे पंचनामे झाले असले तरी अजून एक खडकूही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. कृषिमंत्री नाही, मदत व पुनर्वसन मंत्री नाही त्यामुळे यासंदर्भातील निर्णयही पिकांप्रमाणेच सडू लागले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 7 आणि 8 ऑगस्ट रोजी नांदेड व हिंगोलीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीचा अंतर्भाव असेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. गोदावरी अर्बन बँकेच्या गैरव्यवहारात आकंठ बुडालेले खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री भेट देणार आहेत. परंतु अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फक्त पाच मिनिटांचा वेळ आहे. बाकी सर्व वेळ हारतुऱ्यांसाठी देण्यात आला आहे. गद्दार आमदार संतोष बांगर यांच्या फार्महाऊसचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत. परंतु त्यांच्याकडे वसमत कुरुंदा भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वेळ नाही.

तब्बल 43 लाख हेक्टरवर नुकसान

मराठवाडयात अतिवृष्टीमुळे 43 लाख हेक्टरवरील पिके हातची गेली आहेत. नुकसानीचे ढोबळ पंचनामे करून 303 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठविण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात 35 ठिकाणी ढगफुटी, 42 ठिकाणी तीन वेळा अतिवृष्टी आली. यामुळे साडेतीन लाख पिके अक्षरशः बरबाद झाली आहेत. त्या खालोखाल हिंगोलीत 80 हजार हेक्टरवरील पिके हातची गेली आहेत. अतिवृष्टीने शेतकरी अक्षरशः रस्त्त्यावर आला आहे. संभाजीनगर, परभणी, धारातिर अजून पंचनामे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नुकसानीचा अंदाजही आलेला नाही.

मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीहून रविवारी रात्रीच नांदेड येथे येणार आहेत. सोमवारी 10.45 वाजता ते हुजुर साहिब गुरुद्वारा येथे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.15 ते 12.15 खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचा वेळ राखीव आहे. दुपारी 12.15 ते 12.45 या वेळेत ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करणार असून, याच वेळेत फक्त पाच मिनिटे अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी 12.45 ते 1.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा होणार असून, त्यानंतर दुपारी 1.45 ते 2.00 वाजेपर्यंतची वेळ आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी भेटीसाठी राखीव आहे. नांदेडहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी 2 वाजता हिंगोलीकडे प्रयाण करणार आहेत. हिंगोली जिल्हयातील कळमनुरी येथे दुपारी 2.45 ते 3 वाजेपर्यंत वृक्षारोपण कार्यक्रमास त्यांची उपस्थिती असणार आहे. दुपारी 3 ते 3.45 या वेळेत आमदार संतोष बांगर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेस मुख्यमंत्री उपस्थिती लावतील. सायंकाळी 5 वाजता त्यांच्या उपस्थितीत मेळावा होणार असून, सायंकाळी 6 वाजता सावरखेड येथे आमदार संतोष बांगर यांच्या आलिशान फार्महाऊसचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

अतिवृष्टीमुळे शिवारात दलदल झाली आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने सुतकी कळा आली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या डोळ्यात महापूर आहे आणि मुख्यमंत्री सत्काराचे हारतुरे घेण्यासाठी नांदेडात आलेत. गद्दारांच्या घरीदारी भेटीसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे पण नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर त्यांनी हारतुरे नाकारावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

– दत्ता कोकाटे पाटील, जिल्हाप्रमुख

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली आहे. शिवारात नुसती दलदल झाली आहे. खरीपाचे पिक हातचे गेले असून मदतीच्या नावाखाली अजून छदामही मिळाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीत येत आहेत. त्यांच्याकडे गद्दार आमदार संतोष बांगर यांच्या आलिशान फार्महाऊसचे उद्घाटन करण्यासाठी वेळ आहे. पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी नाही? हे कसले जनतेचे सरकार? हे तर भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार 

– परमेश्वर मांडगे उपजिलाप्रमुख