
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 5 मार्च रोजी रत्नागिरीतील खेडमध्ये दणदणीत सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी पुन्हा शिवसेनेत ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी गद्दार गट आणि भाजपवर तोफ डागली. त्यामुळे रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याच ठिकाणी ‘उत्तर सभा’ होईल, असं जाहीर केले. मात्र,ही उत्तर सभा फुसका बार ठरली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या रटाळ भाषणामुळे श्रोते वैतागले होते.
रामदास कदम आणि योगेश कदम यांनी सभेसाठी जय्यत तयारी केली होती. मुख्यमंत्री येणार म्हणून त्यांनी गर्दीही जमवली. या सभेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी हजेरी लावली. मात्र, या वातावरणाचा फायदा मुख्यमंत्र्यांना घेता आला नाही. त्यांनी पुन्हा पक्षातून बाहेर का पडलो, याची कॅसेट सुरू केली. त्यांच्या भाषणात पुनरावृत्ती असल्याने श्रोते आधीपासूनच कंटाळले होते.
‘आपलं सरकार’ने गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये राज्यातील जनतेसाठी किती विविध प्रकारच्या योजना राबवल्या आहेत, हे सांगतना मुख्यमंत्री कागदावर लिहून आणलेले मुद्दे वाचत होते. त्यामध्येही पुनरावृत्ती होती. तसेच ते वाचताना अडखळत भाषण करत होते. शिंदे यांनी विकासाची रटाळ कॅसेट लावल्याने श्रोते कंटाळले. कोकणच्या विकास योजनांचा विषय आल्यावर त्यांनी माईकवरूनच, अरे तो कोकणच्या योजनांचा कागद कुठे गेला, असे विचारले. त्यावर कोणीतरी तो कागद पुढे सरकवला आणि यापूर्वीच्या कोकण दौऱ्यांमध्ये सांगितलेली योजनांची जंत्री शिंदे यांनी पुन्हा वाचून दाखवली. तसेच व्यासपीठावर बसलेले रामदास कदम आठवण करून देत त्यात भर टाकत होते. त्यामुळे ही उत्तर सभा फुसका बार ठरली असून मुख्यमंत्र्यांच्या नेहमीच्याच कॅसेटला श्रोते कंटाळल्याचे दिसत होते.