मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच लोक निघाले घरी! रत्नागिरीत ‘शासन आपल्या दारी’चा फज्जा

रत्नागिरीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा फज्जा उडाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण सुरू करताच लोक घरी निघू लागल्याने आयोजकांची तारांबळ उडाली. लोकांचे जथेच्या जथे उठून मंडपातून निघून गेले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच मंडपातील बराचसा भाग रिकामा झाला होता.

प्रमोद महाजन क्रीडा संकुल या ठिकाणी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाला गर्दी व्हावी म्हणून जिह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांना बोलावण्यात आले. काही ठिकाणांहून गर्दी जमवण्यासाठी माणसेही गोळा करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच उपस्थित लोकांनी उठून जायला सुरुवात केली. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनीही मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्याकडे दुर्लक्ष केले. एक-एक करून सभामंडपातून लोक बाहेर पडत होते.