कोरोनामुळे मंत्र्यांनी दौरे थांबवले; भाजपचे आंदोलनही स्थगित, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

प्रातिनिधिक फोटो

राज्यावरील कोरोनाचे संकट लक्षात घेऊन राज्यातील बहुतांश मंत्र्यांनी नियोजित दौरे रद्द केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंतचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. तर भाजपने बुधवारचे नियोजित ‘जले भरो’ आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला राज्यातील बहुतांश मंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. पवार यांचे कामकाज सकाळपासून सुरू होते. मात्र आज त्यांनी नागरिकांच्या भेटी घेणेही टाळले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आज हिंगोलीचा दौरा रद्द केला.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही 23 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे पुढे ढकलले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, असे आवाहन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यानिमित्त नागपूरमध्ये आयोजित केलेला स्वागत सोहळा यापूर्वीच रद्द केला आहे.

भाजपचे आंदोलन स्थगित

वीज ग्राहक आणि शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी भाजपने 24 फेब्रुवारीला ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलन स्थगित केल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या