चिखली अर्बनचा जीवन गौरव पुरस्कार पालवे यांच्या ‘सेवासंकल्प’ला जाहीर

135
chikhali-urban-bank

सामना प्रतिनिधी । चिखली (बुलढाणा)

मागील ५८ वर्षापासून सहकारी बँकिंगच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक पाठबळ देणार्‍या दि चिखली अर्बन को ऑप बँकेने पूर्वीपासून समाजीक बांधिलकी देखील जोपासली आहे. विशेषत: सामाजिक क्षेत्रात बँकेची नेहमी सकारात्मक भूमिका राहिली आहे. याच भूमिकेला अनुसरून चिखली अर्बन बँकेच्या वतीने दरवर्षी सहकार, शिक्षण, सामाजिक, कृषी, अध्यात्मिक क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणार्‍या संस्था किंवा व्यक्ती यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात येतो. या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार चिखली तालुक्यातील पळसखेड येथील नंदकिशोर पालवे व आरती पालवे यांच्या सेवासंकल्प प्रतिष्ठान प्रकल्पाला जाहीर करण्यात आला आहे. बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी याबद्दल घोषणा नुकतीच केली आहे. बँकेच्या वार्षिक साधारण सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल अशी माहिती सतीश गुप्त यांनी दिली आहे.

नंदकिशोर पालवे व आरती पालवे यांच्या कार्याचा आढावा केवळ देव्हार्‍यात देव नसतो तर तो माणसात असतो ही उक्ती अमलात आणणारे नंदकिशोर पालवे व आरती पालवे यांचा सेवासंकल्प हा प्रकल्प गेल्या ११ वर्षापासून चालू आहे. अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यांनी समाजातील मानसिक मनोरुग्ण, शारीरिक अपंग, मतीमंद, बेघर यांच्या साठी ते पळसखेड सारख्या छोट्या गावामध्ये एक चांगला प्रकल्प चालवत आहेत. बाबासाहेब आमटे यांनी चालू केलेल्या सामाजिक प्रकल्पाला आदर्श मानून आणि संजय महाराज पाचपोर यांच्या सारख्या महान विभूतींच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प चांगल्या प्रकारे चालू आहे. या प्रकल्पास भेट दिल्यानंतर एक वेगळीच अनुभूती आपल्याला मिळते. जीवन जगत असतांना मोह मायेत सगळे गुंतलेले असतांना एवढ्या लहान वयात ही संकल्पना करणे व ती अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी खूप मोठी ताकद लागते. अशक्यप्राय गोष्टीला शक्य करून नंदकिशोर व आरती पालवे यांनी आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्र भर पोहोचवले आहे.

या कार्याचा गुणगौरव दि चिखली अर्बन बँक त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून करीत आहे. दि चिखली अर्बन बँकेचे संस्थापक व सहकार, शिक्षण, शेती यांचे गाढे अभ्यासक स्व. भगवानदास गुप्त उपाख्य लालजी यांच्या जन्मशताब्दी वर्षात अशा सेवाव्रती लोकांचा गुणगौरव करतांना बँकेच्या संचालक मंडळाला अतिशय अभिमान वाटत आहे. असे बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त म्हणाले. बँकेच्या ५८ व्या वार्षिक साधारण सभेमध्ये १३ जुलै २०१९ रोजी सकाळी १० वाजता नंदकिशोर व आरती पालवे यांना हा जीवन गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल. सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल-श्रीफळ व १ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बँकेच्या वतीने गेल्या १० वर्षापासून हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्थांना हा दिला जातो. या पुरस्कार सोहळ्याला मोठ्या संखेने नागरिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी यावेळेस केली आहे. हा सोहळा १३ जुलै २०१९ रोज शनिवार, सकाळी १०.०० वाजता रानवारा रिसोर्ट, जाफ्राबाद रोड, चिखली येथे संपन्न होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या