पुणे – मंचरमधील लहान मुलांसाठीच्या कोविड केंद्राचे उद्घाटन

आंबेगाव जिल्ह्यातील मंचरमध्ये लहान मुलांसाठीच्या कोविड केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या केंद्राला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्यधाम असे नाव देण्यात आले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या कोविड केंद्राचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. या प्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की ‘कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र सरकारने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक सर्वोच्च न्यायालयाने ‘महाराष्ट्र मॉडेल’ म्हणून उल्लेख केले आहे. याचे श्रेय मुख्यमंत्री,राज्य सरकार,प्रशासनाएवढेच श्रेय सामाजिक संस्था,शिवसेनेसारख्या संघटना,दत्ता गांजाळे यांच्यासारखे कार्यकर्ते यांना आहे.’

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना अधिक त्रास होईल असं म्हटलं जात आहे. हे लक्षात घेऊन त्याचा तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की ‘ सरकार आपले आहे. सरकार कर्तव्य बजावत आहे. आपण राजकीय कार्यकर्ता या नात्याने समाजाची सेवा करणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे.’ शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की लहान मुलांसाठी कोविड केंद्र सुरू करणाऱ्या मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांचे कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेल्या कामाबद्दल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. पुढील काळात शिरूर लोकसभा मतदारसंघातही अशा प्रकारचे लहान मुलांसाठीचे कोविड केंद्र उभारण्याचे काम हाती घेणार आहे असं आढळराव पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या