बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक, शाळांमध्ये ‘सखी सावित्री’ समिती

राज्यातील बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असून सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुला-मुलींमध्ये सुरक्षित, बालस्नेही आणि निकोप वातावरण निर्मितीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘सखी सावित्री’ समितीची स्थापना करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पत्राद्वारे शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.

बालहक्क संरक्षण कायद्यानुसार सर्वच बालकांच्या हिताचे/ हक्कांचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष पेंद्रित करण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुला-मुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले आहेत. पालकांच्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुला-मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच राज्यात बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

घर, शाळा आणि समाजात मुला-मुलींना सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे, तसेच त्यांचे सामाजिक, भावनिक, अध्ययन उत्तमरीत्या व्हावे यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 125 व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक शाळेला आपल्या स्तरावर समितीची स्थापन करावी लागणार आहे. तसेच समितीचा अहवाल कार्यालयास पाठवण्याच्या सूचना विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिल्या आहेत.