बंदी असूनही मराठवाड्यात होत आहेत बालविवाह

998

कायदा हा मोडण्यासाठीच असतो ही मानसिकता समाजाची झालेली आहे. बंदी असूनही हुंडा, लाच असे प्रकार सुरू आहेत. अगदी त्याचप्रमाणे बालविवाहावर बंदी असतानाही सर्रास बालविवाह होत असल्याचे चित्र लातूर जिल्ह्यातच नव्हे तर सबंध मराठवाड्यात निदर्शनास येत आहे. मराठवाड्यातील अल्पवयीन मुलांचे, मुलींचे विवाह बाहेरच्या जिल्ह्यात, शेजारच्या राज्यात जाऊन किंवा गुपचूप घरातच लावले जात आहेत.

लातूर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलामुलींचे विवाह हे शेजारच्या जिल्ह्यातील एखाद्या मंदिराच्या ठिकाणी, अथवा नातेवाईकांच्या घरात, शेतातील वाड्यात, कर्नाटक, आंध्रच्या सीमावर्ती गावांमधून गाजावाजा न करता सुलभपणे होत आहेत. बालविवाह करण्याचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये कमी झालेले आहे, परंतु ते संपूर्ण बंद झालेले नाही. आजही किमान 20 ते 25 टक्के बालविवाहाचे प्रमाण दिसून येत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात हे प्रमाण वाढत असल्याने समाजासमोरचा खरेतर ही गंभीर समस्या आहे. महाराष्ट्रामध्ये 1998-99 मध्ये बालविवाहाचे प्रमाण 47.7 होते. 2005-06 मध्ये हे प्रमाण 39.4 इतके झाले होते, तर 2015-16 मध्ये 26.3 होते.

राज्यातील ग्रामीण भागात बालविवाहाचे हे प्रमाण 1998-99 मध्ये 62.4 होते. 2015-16 पर्यंत हे प्रमाण 32.5 पर्यंत कमी झालेले होते. शहरी भागातील बालविवाहाचे प्रमाण 1998-99 मध्ये 31.4 होते. ते 2015-16 पर्यंत 20.4 वर आलेले होते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणामध्येही ही माहिती देण्यात आलेली आहे. सर्वाधिक बालविवाहाचे प्रमाण महाराष्ट्रातील मराठवाड्यात आहे. त्यामध्येही बीड जिल्हा हा राज्यात अग्रेसर आहे. मराठवाड्यातील बीड नंतर जालना, संभाजीनगर, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि नंतर धाराशिवचा क्रमांक लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी शासकीय स्तरावरून अधिक प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. काही ठिकाणी बालविवाह रोखल्याचे प्रकार उघडकीस येतात परंतु त्याचे प्रमाण हे अत्यल्प आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलींना लग्नाचे अमिष दाखऊन फूस लाऊन पळवून घेऊन जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. पोलीस प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन कडक कारवाई केली तरच या प्रकारावर आळा बसेल अन्यथा मराठवाड्यातील अल्पवयीन मुलींचे भवितव्य दुष्टचक्रातच अधिक अडकण्याची भीती आहे. बालविवाह होऊ नयेत यासाठी जनजागृती करण्याचे काम काही संस्था करतात परंतु त्यांचे प्रयत्न तोकडे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या