धक्कादायक! परळी, गेवराईत ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’, वेबसाईटवर व्हिडीओ व्हायरल

2780
प्रातिनिधिक फोटो

बीड जिल्ह्यातल्या परळी, गेवराई या दोन गावात ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन लहान मुलांचे व्हिडीओ एका वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. मुंबई सायबर क्राईमच्या निदर्शनास हा गंभीर प्रकार आला असून त्यांनी हे व्हिडीओ बीडमध्ये अपलोड झाल्याची माहिती बीड पोलिसांना दिली. यानंतर बीड जिल्ह्यातील परळी, गेवराईमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे. यामागे कुठले रॅकेट आहे का याचा तपासही पोलीस करत आहेत.

राज्यभरातून अशा एकूण 27 व्हिडीओंवर मुंबई डीजी ऑफिस अंतर्गत चालणाऱ्या सायबर सेलकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यापैकी दोन व्हिडीओ हे बीड जिल्ह्यातून अपलोड झाल्याचे पोलिसांना आढळले. एक व्हिडीओ गेवराई तर दुसरा व्हिडीओ परळीमधून अपलोड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे व्हिडीओ कुठे तयार करण्यात आले याचा तपास पोलीस करत आहेत.मात्र व्हिडीओ पॉर्न साईट्सवरुन डाऊनलोड करून सोशल मीडियावर शेअर केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.शिवाय या व्हिडीओमधील पीडित मुलं ही कुठली आहेत हे व्हिडीओ शेयर करणारी व्यक्ती जिल्ह्यातील आहे की बाहेरची की यामागे एखादे रॅकेट आहे, याचा तपास सुरू आहे.

बाल लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ फेसबुकसह इतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर दिल्लीच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात महाराष्ट्राचे सायबर क्राईमचे विशेष पोलीस महानिरीक्षकांशी संपर्क साधून त्यांना कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या