आई-वडिलांना मदत करण्यासाठी लहानसहान गोष्टी विकणाऱ्या मुलांना बालमजूर म्हणता येणार नाही!

आपल्या आईवडिलांना मदत व्हावी यासाठी पेन किंवा इतर लहानसहान गोष्टी विकणाऱ्या लहान मुलांना बालमजूर म्हणता येणार नाही. त्यामुळे पोलीस किंवा बालकल्याण समिती भटक्या पालकांच्या रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊ शकत नाही असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे मत मांडत असतानाच न्यायमूर्ती व्ही.जी.अरुण यांनी हे देखील सांगितले की या मुलांना रस्त्यावर असे भटकण्यापेक्षा शिक्षणासाठी शाळेत पाठवणे हे देखील गरजेचे आहे.  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले होते की, “गरीब असणे हा गुन्हा नाही.” त्यांचे हे वाक्य न्यायमूर्तींनी ऐकवून दाखवले.

केरळ उच्च न्यायालयामध्ये राजस्थानातील एका जोडप्याने दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी आली होती. आपल्या मुलांचा ताबा मिळावा यासाठी या जोडप्याने ही याचिका केली होती. हे जोडपं पेन, चेन, बांगड्या, अंगठ्या आणि अन्य काही किरकोळ गोष्टी विकण्यासाठी राजस्थानहून केरळमध्ये आलं होतं.

29 नोव्हेंबर 2022 रोजी पोलिसांनी त्यांच्या मुलांना रस्त्यावर या वस्तू विकताना पकडलं होतं. ही बालमजूरी असल्याचे सांगत पोलिसांनी या मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर केलं होतं. तिथून या मुलांची रवानगी स्नेहभवन या बालकांसाठीच्या आसरा केंद्रात करण्यात आली होती. या पालकांच्या पालकांकडून हे कबूल करून घेण्यात आलं होतं की ते या मुलांना वस्तू विकण्याऐवजी शाळेत पाठवतील. यावर केरळ उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करताना म्हटले की, जर या मुलांचे पालकच भटके जीवन जगत असतील तर मग या मुलांना चांगले शिक्षण कसे काय मिळेल?

याचिकाकर्ते आणि सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने म्हटले की या मुलांना पोलीस किंवा बालकल्याण समिती ताब्यात घेऊ शकत नाही आणि त्यांना त्यांच्या पालकांपासून दूर ठेवू शकत नाही. यामुळे या मुलांची सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले जावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.