बालके कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर

32

सामना ऑनलाईन, मुंबई

पालघर जिह्यातील बालकांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सातत्याने प्रयत्न करीत असून गेल्या दहा महिन्यांत ७० हजारांपेक्षा अधिक बालकांचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री आणि कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी दिली. गेल्या दहा महिन्यांत दोन हजारांपेक्षा अधिक बालके कुपोषणमुक्त करण्यात यंत्रणेला यश आल्याचेही डॉ. सावंत म्हणाले.

पालघर जिह्यात जानेवारी २०१७ अखेर ४८२ बालमृत्यू झाले. मात्र ते केवळ कुपोषणामुळे झालेले नसून त्यात न्यूमोनियाने ६२ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जन्मतः श्वास गुदमरल्याने ५६, अकाली जन्मामुळे ५१, सर्पदंश व अन्य कारणाने २९, जंतुसंसर्गाने २९ तर अन्य कारणांमुळे ४७ बालकांचा मृत्यू झाल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. सध्या पालघर जिह्यातील कुपोषणाचे प्रमाण आटोक्यात आले असून आरोग्य यंत्रणेमार्फत कुपोषण निर्मूलनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कुपोषण निर्मूलनाचा टास्क फोर्स

  • विविध रुग्णालयांच्या आणि संस्थांच्या मदतीने कुपोषणग्रस्त भागात आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन अतितीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालकांचा आढावा आणि उपाययोजना.
  • १०५ आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आठ हजार बालकांची तपासणी.
  • एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ या काळात १ लाख ७० हजारांहून अधिक बालकांचे सर्वेक्षण.
  • त्यातील १४९२ बालके नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल आणि उपचार.
  • उपचार केंद्रातून घरी सोडलेल्या बालकांची नियमित तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांची घरोघर भेट.
  • पालघर जिह्यात टास्क फोर्सच्या माध्यमातून दरमहा आढावा बैठक.
  • ठाणे जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न.

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करणार
पीसीपीएनडीटी कायदा व तसेच गर्भपात कायद्यात सुधारणा आवश्यक असून केंद्र शासनाकडे या कायद्यात सुधारणा करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. दीपक सावंत यांनी आज दिली.
म्हैसाळ घटनेच्या पार्श्वभूमीवर स्त्रीभ्रूण हत्याविरोधी राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक झाली. डॉ. दीपक सावंत म्हणाले, राज्याबाहेर गर्भलिंग निदान केले जाते आणि महाराष्ट्रात येऊन गर्भपात केला जातो. गर्भलिंग चाचणीस महिलेस प्रवृत्त करणाऱ्या व तिच्यावर दबाव टाकणाऱ्या व्यक्तीला पीसीपीएनडीटी कायद्यातील कलम 23(3) नुसार शिक्षेची तरतूद आहे.

अमिताभ बच्चन ब्रॅण्ड ऍम्बेसेडर
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आता ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पुढाकार घ्यावा यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. स्त्रीभ्रूण हत्याविरोधी जनजागृती मोहिमेकरिता ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काम करावे, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली.

आपली प्रतिक्रिया द्या