खोटं बोलणारी मुले स्मार्ट होतात! संशोधकांचा दावा

सामना ऑनलाईन । टोरंटो

लहानपणी खोटं बोलणाऱ्या मुलांचे भवितव्य उज्जल असते. पुढे जाऊन ही मुले स्मार्ट बनतात, असे नुकत्याच झालेल्या संशोधनाच्या आधारे संशोधकांनी हा दावा केला आहे. त्यांची ग्रहणशक्ती आणि स्वतःचे म्हणणे पटवून देण्याची क्षमता वाखाणण्याजोगी असते. त्यामुळे भविष्यात ही मुले स्मार्ट आणि इंटेलिजन्ट होतात असा दावा संशोधकांनी केला आहे.

लहानपणी बेमालूमपणे खोटं बोलणाऱ्या मुलांबाबत पालक आणि शिक्षक चिंतीत असतात. या खोटं बोलण्याचे त्यांच्यावर दुष्परिणाम होतील अशी भीती त्यांना असते. मात्र, नुकत्याच झालेल्या संशोधनातून लहानपणी खोटं बोलणे ही समस्या नसून अशी मुले भविष्यात स्मार्ट बनतात असे संशोधकांनी सांगितले आहे. एखदी गोष्ट समजण्याची त्यांची क्षमता उत्तम असते असे टोरंटो विद्यापीठातील संशोधक कॅग ली यांनी सांगितले. मात्र, लहान वयात खोटं बोलणे आणि मोठं झाल्यावर खोटं बोलणे यात फरक असल्याचे त्यांनी सांगितले.चीनमध्ये बालवाडीतील 3 वर्षांच्या 42 मुलांच्या वागण्यातील सर्वेक्षणानुसार संशोधकांनी हा दावा केला आहे. या मुलांची दोन गटात विभागणी करण्यात आली. सुरुवातील मुलांना खेळण्यात गुंतवण्यात आले. त्यानंतर तीन दिवसांनी एक खेळ संशोधकांनी त्यांना खेळण्यास सांगितले. एखादे खेळणे देऊन ते त्यांना लपवायचे होते. ते लपवण्यात यशस्वी झाले तर ते खेळणे त्यांना मिळणार होते.

एका गटातील मुलांना खेळणे लपवण्याबाबत आणि त्याबाबत विचारपूस केल्यास समोरच्याशी खोटं बोलून खेळणे मिळवण्याच्या टिप्स देण्यात आल्या. तर दुसऱ्या गटाला अशा कोणत्याही टिप्स देण्यात आल्या नाहीत. त्यानंतर या मुलांची एक चाचणी घेण्यात आली. त्यात स्वनियंत्रण, मानसीकता, निर्णय प्रक्रिया आणि समोरच्या व्यक्तीच्या मनातील भाव ओळखणे याचा समावेश होता. या चाचणीत ज्या गटातील मुलांना खोटं बोलण्याच्या आणि लपवाछपवीच्या टिप्स देण्यात आल्या होत्या, तो गट दुसऱ्या गटापेक्षा सरस ठरला. त्यामुळे लहानपणी खोटं बोलता येणारी मुले समोरच्याचे वागणे-बोलणे ओळखून त्याप्रमाणे वागतात आणि स्मार्ट बनतात असे संशोधकांनी सांगितले.

खोटं बोलणे ही एक नकारात्मक भावना आहे. मुलांना खोटं बोलू नये असे बजावण्यात येते. मात्र, लहान वयात खोटं बोलण्याची सवय असलेली मुलांची समज चांगली असते.मात्र, लहान वयात खोटं बोलणे आणि मोठं झाल्यावर खोटं बोलणे यातील फरक पालकांनी समजून घ्यावा असेही संशोधकांनी म्हटले आहे. आपली मुले स्मार्ट व्हावीत म्हणून त्यांना जाणून बुजून खोटं बोलण्यास शिकवू नये असा सल्लाही संशोधकांनी दिला आहे.