चिम्पांझीच्या विष्ठेपासून बनतेय कोरोनाची लस

जगभराला विळखा घालणाऱ्या कोरोना व्हायरस या विषाणूला रोखण्यासाठी युद्धपातळीवरचे प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नात मानवाच्या पूर्वजांची साथ मिळाली आहे, असं म्हणायला हरकत नाही आणि याचं कारण आहे चिम्पांझी.

चिम्पांझी प्रजातीचे वानर हे मानवाच्या पूर्वजांपैकी एक मानले जातात. त्यांचा जैवविविधतेत मोलाचा वाटा आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये नष्ट होत चाललेल्या चिम्पांझींच्या प्रजाती संरक्षित करण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा कोरोनाच्या या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होताना दिसत आहे.

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जी प्रतिबंधक लस तयार करण्यात आली आहे, त्यात चिम्पांझीच्या विष्ठेत आढळणाऱ्या एका विषाणूचा समावेश आहे. या विषाणूला एडिनोव्हायरस असं म्हटलं जातं. या विषाणूंमुळे चिम्पांझींना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. पण, मानवासाठी हे विषाणू लाभदायक ठरले आहेत.

याचं मुख्य कारण या विषाणूंची संरचना आहे. ज्या जनुकीय घटकापासून कोरोना विषाणूवरील ज्या स्पाईक नावाच्या प्रथिनांचे कवच बनलेले असते, तेच घटक या एडिनोव्हायरसमध्येही आढळतात. त्यामुळे या व्हायरसमध्ये जनुकीय पातळीवर काही बदल करून तो कोरोना लसीत वापरला गेला आहे.

अशा प्रकारची लस टोचल्यानंतर या विषाणूमुळे शरीरात स्पाईक प्रथिनांची निर्मिती होऊ लागते. त्याचा परिणाम म्हणून शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कार्यान्वित होते आणि अशा प्रकारच्या प्रथिनांचे कवच असलेल्या विषाणूंना ओळखायला लागते. जेव्हा कोरोना व्हायरसचा हल्ला शरीरावर होतो, तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा त्या विषाणूला कमकुवत किंवा निष्क्रिय करून टाकते.

या प्रकारच्या लसींचं उत्पादन ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका या दोन कंपन्या करत आहेत. तर हिंदुस्थानात ही लस कोविशिल्ड या नावाने ओळखली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या