
हिंदुस्थान व अमेरिकेने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरचा छोटा भाऊ अब्दुल रौफ अजहरवर जागतिक निर्बंध लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र चीनने या प्रस्तावाला विरोध केला आहे. चीनने आडमुठेपणा करत पुन्हा एकदा जागतिक स्तरावर पाकिस्तानातील दहशतवाद्यांना पाठिंबा दिला आहे. अब्दुल रौफ अजहर हा कंदहार विमान अपहरणातील एक आरोपी आहे.
अब्दुल रौफ अजहर याच्यावर जागतिक निर्बंध आणावेत व त्याची संपत्ती फ्रिज करावी यासाठी हिंदुस्थान व अमेरिकेने संयुक्त राष्ट्र संघात प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला प्रतिबंध समितीच्या 15 सदस्यांची सहमती असती तर तो पारित करण्यात आला असता मात्र चीनने आडकाठी आणत पाकिस्तानी दहशतवाद्याचा बचाव केला.
रॉयर्टसने याबाबत वृत्त दिले आहे. ”आम्हाला या प्रस्तावावर विचार करायला त्याचा अभ्यास करायला थोडा अजून वेळ हवा आहे. समितीमध्ये अशा प्रस्तावांना रोखण्याचा नियम आहे व अशा प्रकारे कित्येक प्रस्ताव रोखलेले आहेत”, असे चीनच्या प्रवक्त्यांनी सांगितले. अमेरिकेने 2010 अजहरविरोधात प्रस्ताव दिला आहे.
”अब्दुल रौफ अजहर हा कुख्यात दहशतवादी मसूद अजहरचा छोटा भाऊ आहे. तसेच त्याने 1994 ला विमान अपहरण केले होते. या वर्षी चीनने दुसऱ्यांदा पाकिस्तानी दहशतवाद्याच्या लिस्टिंगला विरोध केला आहे. याआधी लष्कर ए तोयबाचा दहशतवादी अब्दुल अर रहमान मक्कीवरील निर्बंधांच्या प्रस्तावाला देखील त्यांनी विरोध केला होता”, असे अमेरिकेच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.