चीनचा सीमेवर रणगाडे, हेलिकॉप्टरसह युद्धाभ्यास

38

सामना ऑनलाईन । बीजिंग

हिंदुस्थान आणि चीनमध्ये डोकलाम वरुन तणाव निर्माण झाला असताना चिनी सैन्याने सीमेवर युद्धाभ्यास सुरू केला आहे. चिनी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीने हिंदुस्थानच्या सीमेजवळ रणगाडे आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टरसह युद्धाभ्यास केला.

चीनच्या चायना सेंट्रल टेलिव्हीजन (सीसीटीव्ही) ने चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या युद्धाभ्यासाचा पाच मिनिटांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हिंदुस्थानच्या सीमेवर तैनात असलेले पीपल्स लिबरेशन आर्मीची १० पथके या युद्धाभ्यासामध्ये सहभागी झाली होती. व्हिडिओमध्ये अनेक रणगाड्यांमधून दारूगोळा आणि हेलिकॉप्टरमधून सलग गोळीबार सुरू असल्याचे दिसत आहे.

याआधीही चीनने हिंदुस्थान सीमेजवळ युद्ध सामग्रीचा साठा करण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आले होते. तसेच चीनकडून सीमेजवळील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा साठा करण्यास सुरुवात करण्यात आल्याचेही समोर आले होते. अशातच सीमेजवळ चीनने अत्याधुनिक रणगाडे आणि हेलिकॉप्टरसह युद्धाभ्यास केल्याचे वृत्ताने चीनचा मनसुबा युद्धाचाच असल्याचे दिसत आहे.

डोकलाममध्ये तणाव असताना चीनने १५ ऑगस्टला लडाखमधील पँगाँग सरोवराजवळ घुसखोरीचा प्रयत्न केला होता. घुसखोरीचा हा प्रयत्न हिंदुस्थानच्या सैनिकांनी उधळून लावल्यानंतर चिनी सैनिकांनी दगडफेक केली होती. दोन्ही बाजूकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये काही सैनिक जखमी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या