देशाला धोका! चीनमध्ये मुसलमानांना हॉटेलबंदी!!

32

सामना ऑनसलाईन, पेइचिंग

चीनने शिनजियांग प्रांतातील उइगर मुसलमानांविरोधातील कायदे अधिक कठोर केले आहेत. चीनमध्ये हॉटेलमध्ये राहण्यास मुसलमानांना बंदी करण्यात आली आहे. चीनमध्ये दहशतवाद आणि कट्टरपंथीयांना उइगर मुसलमान प्रोत्साहन देत असल्याने देशाला त्यांचा धोका आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे चीनकडून सांगण्यात आले.

सरकारने जाहीर केलेल्या या नियमाची १८ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी होणार आहे, मात्र प्रशासनाने या नियमाच्या अंमलबजावणीला आतापासूनच सुरुवात केली आहे. मुसलमानांना हॉटेलमध्ये राहायला दिल्यामुळे शिनजियांग प्रांतात ‘सेव्हन डेज इन’ या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने या हॉटेलने नियम मोडल्यामुळे त्यांना १५ हजार युआनचा दंड ठोठावला आहे. यापुढे हॉटेलमध्ये राहणाऱ्यांची माहिती पोलिसांना देण्यात येणार आहे. त्यानुसार पोलिसांना कोणाचाही संशय आल्यास ते त्यांना हॉटेल सोडण्याचे आदेश देऊ शकतात असे हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सुरक्षेसाठी निर्णय
शिनजियांग प्रांतात उइगर मुसलमानांची संख्या जास्त आहे. या भागात दहशतवादाच्या आणि स्फोटाच्या घटना घडत असतात. उइगर मुसलमानांविरोधात चीन दबावतंत्र वापर करत असल्याचा आरोप करत ‘इसिस’ने चीनला धमकी दिली होती. दहशतवाद आणि कट्टरपंथीयांना उइगर मुसलमान प्रोत्साहन देत असून देशाला त्यांच्यापासून धोका आहे. देशाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या