चीनमध्ये कोविडच्या नव्या व्हेरिएंटचा धुमाकूळ, जूनमध्ये आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लाटेची शक्यता

china-wrestles-with-covid-surge

चीनमध्ये पु्न्हा कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. व्हायरसच्या नवीन लाटेचा सामना करताना चीनी अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटला रोखण्यासाठी लस निर्मितीवर चिनी अधिकारी जोर देत आहेत. लसीकरण मोहिमेची घाई करण्यामागे कोरोना संसर्गाचा वाढता धोका सांगण्यात येत आहे. जूनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शिखरावर पोहोचण्याची शक्यता आहे. आठवड्याला सुमारे 65 दशलक्ष लोकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने गेल्या वर्षी त्याच्या ‘झिरो कोविड’ धोरणातून माघार घेतल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे.

अधिकृत मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टन पोस्टने माहिती दिली आहे की, XBB ओमिक्रॉन सबव्हेरियंटसाठी दोन नवीन लसी तयार करण्यात असून प्राथमिक स्वरूपात देण्यात येत आहेत. ग्वांगझू येथे झोंग म्हणाले की, आणखी तीन ते चार लसींना लवकरच मान्यता मिळेल, परंतु त्यांनी अधिक माहिती दिली नाही.

गेल्या हिवाळ्यात चीनने आपलं अत्यंत कठोर असे झिरो-कोविड धोरण मागे घेतलं. त्यानंतर होणारा नवीन उद्रेक हा आतापर्यंतचा सगळ्यात भयंकर असण्याची शक्यता आहे.

युनायटेड स्टेट्समध्ये देखील संक्रमणांमध्ये वाढ झाली असली तरी, सार्वजनिक आरोग्य आणीबाणी 11 मे रोजी संपली आहे असे घोषित केले गेले होते. तरीही तज्ज्ञांनी नवीन व्हेरिअंटमुळे आजारांची आणखी एक लाट येण्याची शक्यता नाकारलेली नाही, असं वॉशिंग्टन पोस्टमधून सांगण्यात आलं आहे.

चीनमधील अधिकारी असा दावा करतात की, सध्याची लाट कमी तीव्रतेची असेल, परंतु सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, देशातील वृद्धांवर त्याचा अधिक परिणाम दिसू शकतो. अशा वेळी मृत्युदर रोखण्यासाठी एक बूस्टर लसीकरण कार्यक्रम आणि रुग्णालयांमध्ये अँटीव्हायरलचा तयार पुरवठा आवश्यक आहे.