डोकलाम, नाकू ला मध्ये चीनने बनवला क्षेपणास्त्र तळ; सॅटेलाईट छायाचित्रातून स्पष्ट

हिंदुस्थान आणि चीनमध्ये सीमावादावरून तणाव आहे. त्यातच सॅटेलाईटच्या छायाचित्रातून धक्कादायक माहिती मिळाली आहे. चीनने डोकलाम आणि नाकू ला मध्ये क्षेपणास्त्र तळ बनवल्याचे छायाचित्रातून स्पष्ट होत आहे. हिंदुस्थान आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झालेल्या ठिकाणाजवळ असाच तळ उभारण्यात आला आहे.

सोर्स इंटेलिजन्स एनालिस्टने ट्विटर हँडलवर हे नवे सॅटेलाईट छायाचित्र शेअर केले आहे. त्यात दोन तळ दिसत आहेत. त्यात चीनचे लष्कर जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसाठी साईट तयार करत असल्याचे दिसत आहे. चीनकडून सातत्याने डोकलाम आणि नाकू ला सारख्या वादग्रस्त ठिकाणी छुप्या कारवाया करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वादग्रस्त ठिकाणांजवळ चीनकडून संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नव्या छायाचित्रातून दिसून येत आहे.

हिंदुस्थानकडून चीनच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवण्यात येत आहे. चीनच्या हालचाली बघता हिंदुस्थानने सीमारेषेजवळ बोईंग 8 लढाऊ विमाने तैनात केली आहेत. अशा प्रकारे क्षेपणास्त्र तळ उभारून हिंदुस्थानवर दबाव टाकण्याचा चीनचा प्रयत्न आहे. सॅटेलाईट छायाचित्रानुसार डोका ला पासून 50 किलोमीटर अंतरावर डोकलाम पठारावर हा तळ आहे. या भागात 2017 मध्ये हिंदुस्थान आणि चीनचे लष्कर आमने सामने होते. सुमारे 70 दिवसांपेक्षा जास्त काळ डोकलाम तणाव सुरू होता. चीनने क्षेपणास्त्र तळ उभारलेल्या ठिकाणी दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष झाला होता. त्यामुळे चीनकडून सीमाभागत छुप्या पद्धतीने संरक्षणात्मक हालचाली करण्यात येत आहे. चीनकडून संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम आणि गतीमान करण्यावर भर देण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या