धक्कादायक! चीनची अरुणाचलमध्ये 4.5 किलोमीटर घुसखोरी, नवीन गावही वसवलं

लडाखमध्ये चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव अद्याप कमी झालेला नाही, तोच आता विस्तारवादी भूमिका असलेल्या चीनने हिंदुस्थानच्या अरुणाचल प्रदेशमध्येही आणखी एक आगळीक केली आहे. चीनने तब्बल साडे चार किलोमीटर आत घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे या भागात चीनने नवीन गाव वसवले असून 101 घरेही बांधली आहेत.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, अरुणाचल प्रदेशमधील सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या किनाऱ्याजवळ चीनने हे नवीन गाव वसवले आहे. याचे सॅटेलाईट फोटोही समोर आले आहेत. या भागावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू असून मागे सशस्त्र संघर्षही झाला होता. परंतु आता चीनने येथे एक अख्खे गावच वसवल्याचे समोर आल्यानंतर हिंदुस्थानच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, याबाबत भाजप खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनीही ट्वीट केले आहे. चीनच्या या कृतीवर सवाल उपस्थित करत या प्रकरणी आपण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ऑगस्ट 2019 ला येथे गावाचे कोणतेही निशाण नव्हते. मात्र नोव्हेंबर 2020 ला घेण्यात आलेल्या सॅटेलाईट फोटोमध्ये येथे गाव वसवण्यात आल्याचे स्पष्ट दिसले. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर चीनने हे गाव वसवल्याचे बोलले जात आहे. ही हिंदुस्थानसाठी चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

सुब्रमण्यन स्वामी राजनाथ सिंह यांच्याशी करणार चर्चा

दरम्यान, भाजप खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी चीनने अरुणाचलमध्ये केलेल्या घुसखोरीवर सवाल उपस्थित केला असून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले. ते म्हणाले की, ‘चीनने लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हिंदुस्थानच्या भूभागावर कब्जा केलाय हे मान्य करणे मोठी चूक होईल. वेळ आल्यावर राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करेन. कारण याबाबत परराष्ट्र मंत्रालय आम्ही तणाव कमी होण्यासाठी चर्चा करत आहोत असेच उत्तर देईल आणि त्याला काय अर्थय?’

आपली प्रतिक्रिया द्या