लडाखच्या गलवान घाटीवर चीनने मिळवला ताबा; हिंदुस्थानला धमकी देत दर्पोक्ती

6263

चीन आणि हिंदुस्थानमध्ये पुन्हा एकदा सीमवादावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आता चीनने लडाखमध्ये घुसखोरी सुरू केली असून हिंदुस्थानच्या भागात लष्करी शिबिरेही उभारली आहेत. तसेच हिंदुस्थानच्या गलवान घाटीवर ताबा मिळवला असून हा चीनचा भूभाग असल्याचा दावा करत हिंदुस्थानने या भागापूसन दूर राहावे असा इशारा दिला आहे. 1962 च्या युद्धाची आठवण करून देत हिंदुस्थानला धमकी देत डोकलामपेक्षा मोठा वाद होण्याची दर्पोक्तीही केली आहे. सध्या चीनच्या सैनिकांनी पेगाँग झऱ्याच्या परिसरात गस्त वाढवून या भागात लष्करी शिबिरे उभारली आहेत. तसेच हिंदुस्थानी भागात घुसखोरीला सुरुवात केली आहे. तसेच सीमावादाला हिंदुस्थानच जाबाबदार असल्याचा कांगावाही केला आहे.

गलवान घाटीवर चीनचा अधिकार असून या चीनचा भूभाग असल्याचा दावा चीनच्या सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने केला आहे. हा चीनचा भाग असून हिंदुस्थान जाणूनबुजून सीमावाद निर्माण करत असल्याचा दावाही वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. हिंदुस्थानने या भागात लष्करी सोयीसुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हिंदुस्थानचा या भागातील हस्तक्षेप वाढल्यास चीनच्या लष्कराला याला प्रत्युत्तर द्यावे लागेल, असेही वृत्तपत्राने म्हटले आहे. चीन आणि अमेरिकेतील संबंधात तणाव असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर 1962 च्या तुलनेत चीनचे सामर्थ्य वाढले आहे. त्यावेळी चीन -हिंदुस्थान तुल्यबळ असूनही हिंदुस्थानला पराभव पत्करावा लागला होता. याचा विचार हिंदुस्थानने करावा. हिंदुस्थानपेक्षा चीनचा जीडीपी आज पाचपटींनी जास्त आहे. त्यामुळे परिस्थितीचा विचार करत हिंदुस्थानने गलवान घाटीपासून दूर रहावे, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

हिंदुस्थान आणि चीनदरम्यान 3,500 किलोमीटर लांबीची वास्तविक नियंत्रण रेषा आहे. या रेषेच्या परिसरातील भागाच्या ताब्यावरून दोन्ही देशात वाद होतात. अनेकदा स्थानिक पातळीवर वाद सोडवण्यात येतात. डोकलाम, अक्साईचीन, पेगाँग झऱ्याचा परिसर अशा भूभागाबाबत दोन्ही देशात वाद आहेत. या वादातून अनेकदा दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने येतात. या महिन्यापासून चीनच्या सैनिकांनी हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरीला सुरुवात केली आहे. पेगाँग झऱ्याच्या परिसरात लष्करी शबिरे उभारून गस्त वाढवण्यात आली आहे. तर आता चीनने गलवान घाटीवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही देशात सीमावादावरून तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या