#coronavirus चीनमध्ये मृतांची संख्या 80वर, 2300 जण कोरोना ग्रस्त

646

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून मृतांचा आकडा 80 वर पोहोचला आहे. चीन सरकारकडून जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 2300 जण कोरोना व्हायरसने ग्रस्त आहेत. वुहान या शहरातून पसरलेला हा व्हायरस आता शांघाय शहरातही पसरला आहे.

वुहान शहरातील हुबेई या शहरात या व्हायरसचा मोठा प्रभाव असून चीन सरकारने या शहरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. तेथील नागरिकांच्या प्रवासावर बंदी आणली आहे. त्यामुळे कायम गजबजलेले असलेल्या या शहरातील रस्ते सुनसान पडले आहेत. सरकारने दुसऱ्या शहरात जाणाऱ्या बस व रेल्वे सेवाही थांबविल्या आहेत. या शहरात प्राण्यांच्या कत्तली थांबविल्या असून नागरिकांना फक्त भाजीपाला खाण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रूग्णांमुळे चीन सरकारने या शहरात 10 दिवसांत 1000 खाटांचे रुग्णालय बांधण्याची घोषणा केली आहे.

कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पहिली घटना 31 डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. हा आजार 2003 मध्ये पसरलेल्या सीव्हिअर अॅक्यूट रेसिपिरेट्री सिंड्रोम म्हणजे सार्स सारखाच धोकादायक असल्याचे मानले जाते. चीन व्यतिरिक्त कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण हे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, हाँगकाँग, मकाऊ आणि तैवानमध्ये आढळून आले आहेत.

हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयही चीनमधील कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे सतर्क झाले आहे. चीनमधील हिंदुस्थानी दूतावासानेही तेथील माहिती येथे पाठवली आहे. चीनमधून विमानाने येणाऱया प्रत्येक प्रवाशाची हिंदुस्थानात कसून तपासणी केली जात असून चीनमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या