काँग्रेसने लडाखकडे दुर्लक्ष केल्याने चीनचे फावले, खासदार नामग्याल यांचा हल्लाबोल

1834

लोकसभेमध्ये कलम 370 वर चर्चा सुरू असताना आपल्या भाषणाने देशाचे लक्ष वेधून घेतलेले लेहचे भाजप खासदार जामयांग त्शेरिंग नामग्याल यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने लडाखकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याचमुळे चीनचे फावले आणि ते डेमचोक सेक्टरपर्यंत घुसखोरी करू शकले, अशी टीका नामग्याल यांनी केली.

खासदार जामयांग त्शेरिंग नामग्याल म्हणाले की, ‘माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चीनप्रती ‘फॉरवर्ड पॉलिसी’वर जोर दिला होता. यात ते म्हणतात की चीनकडे आपण इंचाइंचाने सरकायला हवे. परंतु याची अंमलबजावणी करताना मात्र ती ‘बॅकवर्ड पॉलिसी’ झाली. चीनच्या सैन्याने सातत्याने आपल्या भूभागात घुसखोरी केली आणि आपण फक्त विरोध करत राहिलो. हेच कारण आहे की आजही अक्साई चीन पूर्णपणे चीनच्या ताब्यात आहे.’

‘काँग्रेसने लडाखकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. नेहरूंनी तर ज्या जमिनीवर गवताचे एक पातेही उगवत नाही ती निरुपयोगी असल्याचे म्हटल्याचा उल्लेख नामग्याल यांनी केले. याचाच फायदा चीनच्या पीपुल लिबरेशन आर्मीने घेतला आणि आता हे जवान डेमचोक सेक्टरपर्यंत पोहोचले आहेत. लडाखच्या सुरक्षेला काँग्रेसने काहीही महत्व दिले नाही’, असेही ते म्हणाले.

कश्मीर प्रश्नावर काँग्रेसच्या धोरणावर टीका
कश्मीरमध्ये जेव्हा कधी परिस्थिती बिकट होत असे तेव्हा काँग्रेस विशेष पॅकेजची घोषणा करून परिस्थिती नियंत्रणात आणायची. परंतु यामुळे दगडफेक करणारे आनंदात असायचे आणि फुटिरवादी, हुर्रियत नेत्यांना सुरक्षा मिळायची. कश्मीर प्रश्नावर काँग्रेसने कधीही कडक धोरण राबवले नाही याची फळे आपण आज भोगतो आहोत, असा आरोपही नामग्याल यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या