चीनमधील मुस्लीम नागरिकांवर डुकराचे मांस खाण्याची सक्ती

सामना ऑनलाईन । बीजिंग

चीनमधील मुस्लीम नागरिकांना डुकराचे मांस खाण्याबरोबरच दारू पिण्याची सक्ती केली जात असल्याचे समोर आले आहे. इंग्लडमधील एका इंग्रजी वृत्तपत्राने याबदद्ल माहिती दिली आहे. चीनमध्ये नववर्ष सुरू झाले आहे. चिनी दिनदर्शिकेनुसार हे वर्ष डुकराला समर्पित असल्याने सर्वधर्मीयांना डुकराचे मांस खाण्याबरोबर दारू पिण्याची सक्ती केली जात आहे, असे येथील नागरिक सांगत आहेत. या घटनेमुळे जगभरातील मुस्लिमांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

चीनमध्ये 6 फेब्रुवारीपासून चीनी नववर्षारंभ सुरू झाला आहे. चिनी दिनदर्शिकेनुसार प्रत्येक वर्ष हे 12 राशीत येणाऱ्या एकेका प्राण्याला समर्पित केले जाते. दरवर्षी राशीनुसार येणाऱ्या प्राण्याचे नाव त्या त्या वर्षाला दिल्याने वर्षभर सुखसमृद्धी नांदते, अशी चिनी नागरिकांची धारणा आहे. या पार्श्वभूमीवर चिनी सरकार मु्स्लीम लोकांनाही डुकराचे मांस खाण्याची बळजबरी करत आहे. डुकराचे मांस खाणे व दारू पिणे इस्लाम विरोधात आहे. हे माहीत असूनही चिनी सरकार मुस्लिमांवर अन्याय करत असल्याचा आरोप येथील मुस्लीम नागरिकांनी केला आहे.

येथील कजाख भागात राहणाऱ्या मुस्लीम बांधवांना सरकारतर्फे नववर्ष साजरा करण्याचे व घरासमोर सजावट करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच सरकारतर्फे भोजनाची सोयही करण्यात आली होती. त्यामुळे मुस्लीम नागरिक तेथे गेले. पण तेथे जेवणात डुकराचे मांस ठेवण्यात आले होते. तसेच दारूची सोयही करण्यात आली होती. विशेष म्हणजे या दोन्हींचे सेवन करण्याची मुस्लीम नागरिकांवर सक्ती करण्यात येत होती. ज्यांनी त्यास विरोध केला त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या