संगमेश्वरातील ग्रामपंचायतीचा चिनी वस्तूंवर बहिष्काराचा ठराव

642

गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने आगळीक करत भ्याडपणे हिंदुस्थानी सैनिकांवर हल्ला केला होता. या घटनेनंतर संपूर्ण हिंदुस्थानात चीनविरोधी भावना निर्माण झाली आहे. यानंतर केंद्र सरकारने चीनी कंपन्यांच्या मालकीच्या TikTok सहित 59 applications वर बंदी घातली होती.  संगमेश्वरातील पिरंदवणे ग्रामपंचायतीने देखील चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं ठरवलं आहे. त्यांच्या मासिक सभेत एकमताने याबाबतचा ठराव करण्यात आला. आगामी गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी हे सण आणि त्या निमित्ताने होणारी खरेदी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कमीत कमी एक लाख रुपये किंमतीच्या चिनी बनावटीच्या मालाची उचल होणार नाही असा अंदाज सरपंच माधवी गुरव यांनी व्यक्त केला.

ठराव जाहीर करताना माधवी गुरव म्हणाल्या की, देशावर संकट येतं तेव्हा सीमेर लढणाऱ्या जवानांना मदत म्हणून देशातील नागरीक त्यांना शक्य होईल तसे प्रयत्न करत असतो. पिरंदवणे गावातील लोकांनीही असाच एक निर्णय घेतला असून ग्रामपंचायतीला हा ठराव करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. या ठरावाबद्दल बोलताना ग्रामसेविका सौ. माया गुरखे म्हणाल्या, देशावर संकट आल्यावर सामान्य नागरिक काय करू शकतो याचे आदर्श उदाहरण पिरंदवणे गावाने समोर ठेवले आहे. अधिकृतरित्या चिनी साहित्यावर बहिष्कार टाकणारे पिरंदवणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले तर महाराष्ट्रातील दुसरे गाव आहे.

गावातील मानकरी श्री. अरविंद मुळे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. या ठरावाबाबत बोलताना ते म्हणाले की कर्नल संतोष बाबू व त्यांच्या साथीदारांच्या हौतात्म्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. चीनला धडा शिकवण्यासाठी आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो याबाबत विचार करण्यात आला आणि त्यानंतर हा ठराव करण्यात आला. “आमच्या एका गावाने चिनी वस्तूंची खरेदी केली नाही म्हणून कदाचित चीनला फरक पडणार नाही. पण चीनने हे लक्षात ठेवावे की भारतात काही लाख गावे देशभक्त आहेत. आणि त्यांचा संकल्प चीनला जड जाईल.” असे मुळे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या