चीनच्या फुजियान प्रांतात डेल्टा व्हेरिएंटचा कहर; शहर सिल

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढलेला दिसत आहे. दक्षिणेकडील फुजियान प्रांतात डेल्टा व्हेरिएंटचा प्रकोप वाढल्याने शहर सिल करण्यात आले आहे. शहरातील सनिमाघर, जिम आणि महामार्ग बंद करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी शहराबाहेर जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुन्हा प्रांतामध्ये कोरोनाने डोके वर काढल्याने चीनची चिंता वाढली आहे. तसेच याचे संक्रमण झपाट्याने पसरत आहे.

फुजियानच्या पुतियान शहरात कोरोना संक्रमणाची स्थिती बिकट झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. या शहरात डेल्टा व्हेरिएंट संक्रमणाचा फैलाव आढळला असून इतर व्हेरिएंटचे रुग्णही आढळून आल्याने चीनची चिंता वाढली आहे. त्यामुळे चीनने आरोग्य यंत्रणेचे विशेष तपास पथक शहरात पाठवले आहे. तसेच ऑफलाईन शाळाही बंद केल्या आहेत.

फुजियान प्रांतात 10 ते 12 सप्टेंबरमध्ये कोरोनाचे 43 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 35 रुग्ण पुतियान शहरातील आहेत. तसेच लक्षणे नसलेले 32 संशयित रुग्णही आढळले आहेत. 12 सप्टेंबरपर्यंत चीनमध्ये एकूण 95,248 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील 4,636 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

चीनच्या जियांग्सू प्रांतातही कोरोनाचा प्रकोप वाढला होता. त्यावेळी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी दोन आठवडे लागले होते. पुतियानमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रकोप झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाचा प्रकोप इतर प्रांतात पसरू नये, यासाठी आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या