अग्नी-5 चीनला-भीती

हिंदुस्थानने अग्नी-५ या ५ हजार ८०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने हिंदुस्थानची जगभरात प्रतिष्ठा तर वाढलीच, परंतु या चाचणीचा चीनने धसका घेतला आहे. यावर प्रकाश टाकला आहे डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी.

हिंदुस्थानने नुकतीच अग्नी-५ या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. ही चाचणी यशस्वी झाली असून हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाच्या प्रगतीतील तो एक मानाचा तुरा ठरला आहे. या यशस्वी परीक्षणामुळे हिंदुस्थान इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल (आयसीबीएम)या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा देशांच्या गटात जाऊन पोहोचला आहे. आजघडीला जगात अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे पाचच देश आंतरमहाखंडीय क्षेपणास्त्र विकसित करणारे आहेत. आता यामध्ये जर हिंदुस्थानचा समावेश झाला आहे. संपूर्ण आशिया खंडात आपला प्रभाव जाणवून देण्याच्या आणि  एक विभागीय महासत्ता म्हणून पुढे येण्याच्या हिंदुस्थानच्या प्रयत्नांच्या दृष्टिकोनातून ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे.

अग्नी-५ हे अत्यंत वैशिष्टय़पूर्ण क्षेपणास्त्र आहे. त्याची प्रमुख वैशिष्टय़े अशी आहेत.

क्षेपणास्त्राचा विस्तृत पल्ला : जगामध्ये २७ देश लघु किंवा मध्यमपल्ल्यांची क्षेपणास्त्रs विकसित करतात. मात्र अग्नी-५ हे दीर्घपल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने ५,८०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर मारा करता येतो. थोडक्यात चीनमधील प्रत्येक शहर या क्षेपणास्त्राच्या पल्ल्यात येऊ शकते.

बहुलक्ष्यी क्षेपणास्त्र : या क्षेपणास्त्रामध्ये एकाच वेळी एकाहून अधिक  ठिकाणी हल्ला करण्याची क्षमता आहे. ते डागले जाईल तेव्हा एकाच वेळी पाच लक्ष्यांवर विभागले जाते. त्यामुळे त्याला अडवणे अवघड ठरते.

वाहून नेण्यास सुलभ : अग्नी-५ हे क्षेपणास्त्र वाहून नेण्यास अत्यंत सुलभ आहे. एखाद्या मोठय़ा ट्रकच्या सहाय्यानेही ते कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत नेता येऊ शकते. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्यामुळे ते कुठून डागले आहे हे शत्रूला कळूदेखील शकणार नाही.

आण्विक शस्त्रांचा मारा : या क्षेपणास्त्रावरून साधारण 1000 किलो वजनाची आण्विक शस्त्र लादून मारा केला जाऊ शकतो.

स्वदेशी बनावट : हिंदुस्थानने चार प्रकारची क्षेपणास्त्र विकसित केली आहेत. पृथ्वी, अग्नी, आकाश आणि ब्राह्मोस. या चारपैकी अग्नि हे संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे. त्याच्या निर्मितीसाठी आपण कोणत्याही देशाची मदत घेतलेली नाही. पाकिस्तानने शाहीन किंवा आता विकसित करण्यात असलेले तैमूर हे चीन किंवा उत्तर कोरिया यांच्या मदतीने विकसित केले आहे. पण हिंदुस्थानने अग्निची निर्मिती स्वबळावर विकसित केली आहे.

आता प्रश्न असा निर्माण होतो की अग्नि-५ ची गरज किंवा त्याच्या निर्मितीचा उद्देश काय आहे हा. या क्षेपणास्त्राचे मुख्य उद्दिष्ट सामरिक प्रतिरोधन किंवा स्ट्रटेजिक डेटरन्स किंवा धाक निर्माण करणे हे आहे. ते प्रथम हल्ला करण्यासाठी नाही. केवळ धाक दाखवून हे आपले उद्दिष्ट साध्य करणे हा याच्या निर्मितीमागचा हेतू आहे. आजघडीला आशिया खंडात फक्त चीन आणि हिंदुस्थान यांच्यातच स्टॅटेजिक डेटरन्सची क्षमता आहे.

हिंदुस्थानने तीन दशकांपूर्वी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची सुरुवात केली. १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी बनावटीची क्षेपणास्त्र विकसित करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्याकाळी आण्विक क्षेपणास्त्र विकसित करणाऱया देशांनी हिंदुस्थानवर विविध प्रकारचे निर्बंध टाकले होते. या निर्बंधांमुळे हिंदुस्थानला क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात मदत मिळत नव्हती. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी देशातील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)कडे ही जबाबदारी सोपवली. या मोहिमेचे नाव इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम असे ठेवण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत १९८८ मध्ये पहिल्यांदा पृथ्वी या क्षेपणास्त्राचा विकास केला. त्याचा पल्ला २५० ते ५०० किलोमीटर होता. त्यानंतर १९८९ अग्नी-१ ची यशस्वी चाचणी झाली. त्यानंतर अग्नि १, २, ३ आणि 4 यांच्या चाचण्या झाल्या. गेल्य २७ वर्षांमध्ये सातत्याने या चाचण्या सुरू आहेत. अग्नी-५ ची पहिली चाचणी २०१२ मध्ये झाली होती. त्यानंतर २०१५ मध्येही त्याची चाचणी करण्यात आली; पण  या चाचणीनंतर या क्षेपणास्त्रामध्ये काही तांत्रिक बदल करण्याची गरज जाणवली. हे बदल करून गतवर्षीच अंतिम चाचणी घेता आली असती; मात्र

त्यावेळी हिंदुस्थान न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी प्रयत्नशील होता. तसेच मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजीम या ३४ देशांच्या समूहाचे सदस्यत्व मिळवण्याच्या प्रयत्नात हिंदुस्थान होता. त्यामुळे हिंदुस्थानने ही चाचणी केली नाही.

मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजीम हा क्षेपणास्त्र बाळगणाऱया, पण स्वत:वर नियंत्रण असणाऱया देशांचा समूह आहे. सद्य परिस्थितीत  अमेरिकेकडे ट्रायडंट जातीचे, चीनकडे डाँग फेंग, फ्रान्सकडे एम-५१ आणि रशियाकडे एम-३१ आर आणि इंग्लडकडे अमेरिकेसोबत विकसित केलेले ट्रायडंट अशा पद्धतीची क्षेपणास्त्र आहेत. हिंदुस्थानला मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजीमचे (एमटीसीआर)सदस्यत्व मिळाले आहे; मात्र न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपचे सदस्यत्वाचे प्रयत्न लांबणीवर पडले आहेत. त्यामुळेही हिंदुस्थानने अग्नि-५ चे परीक्षण केले. एमटीसीआरचे सदस्यत्व मिळणे हिंदुस्थानसाठी महत्त्वाचे होते. जबाबदारीने क्षेपणास्त्राचा विकास करू शकणाऱया आणि स्वत:वर नियंत्रण असणाऱया देशांनाच हे सदस्यत्व देण्यात येते. हे सदस्यत्व दिले गेल्यानंतर अशा प्रकारच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण इतर देशांना करता येत नाही; मात्र इतर देशांकडून क्षेपणास्त्राच्या विकासासाठी मदत घेता वा देता येऊ शकते. तसेच काही प्रमाणात क्षेपणास्त्राची निर्यात करण्याची  मुभा या देशांना मिळते. हे सदस्यत्व मिळाल्यानंतर हिंदुस्थान आता रशियाच्या मदतीने विकसित केलेले `आकाश’ हे  मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र निर्यात करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे हिंदुस्थान आता क्षेपणास्त्रांची निर्यात करणाऱया देशांत सामील झाला आहे.

अग्नि-5 चा पल्ला अधिक असल्याने चीनची १९  शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात. त्यामुळे या क्षेपणास्राच्या माध्यमातून हिंदुस्थान एकीकडे आपली क्षमता चीनला दाखवून देतो आहे; तर  दुसरीकडे चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे घाबरलेल्या दक्षिण पूर्व आशियातील छोटय़ा देशांना, उत्तर पूर्व आशियातील देशांना हिंदुस्थानची मदत मिळू शकते असा विश्वासही निर्माण झाला आहे. हा विश्वास निर्माण करण्यात आलेले यश हिंदुस्थानसाठी महत्त्वाचे आहे.

एखाद्या राष्ट्राकडे असलेल्या विविध क्षेपणास्त्रांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्या राष्ट्राचा दर्जा वाढतो. अण्वस्त्र विकासाच्या क्षमतेमुळे राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय सामर्थ्य वाढते. त्याच पद्धतीने विविध क्षेपणास्त्र ही सामर्थ्यांचे प्रतीक मानली जातात. या प्रतिकांचा फायदा हिंदुस्थानला आर्थिक आणि व्यापारी हितसंबंध जपण्यासाठी होणार आहे. त्यामुळे केवळ सामरिक दृष्टीनेच नव्हे तर आर्थिकदृष्टय़ाही अग्नि-५ हिंदुस्थानसाठी उपयुक्त आहे.

शेजारी राष्ट्र म्हणून पाकिस्तानशी तुलना करता त्यांच्याकडे अग्निच्या समकक्ष असणारे शाहीन हे क्षेपणास्त्र आहे. पण त्याचा पल्ला जास्तीत जास्त २५०० किलोमीटर आहे. पाकिस्तानही आता `तैमूर’ नामक आंतरमहाखंडीय क्षेपणास्र विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे,  पण त्यासाठी अद्याप अनेक चाचण्या करण्याची गरज आहे. याबाबत चीनचे उदाहरण घेतल्यास चीन हिंदुस्थानच्या कैकपटीने  प्रगतीपथावर आहे. चीनचे डाँग फेंग हे क्षेपणास्त्र १२००० किलोमीटर पल्ल्याचे आहे. इतक्या दीर्घपल्ल्याचे क्षेपणास्र बनवण्यास हिंदुस्थानला अद्याप आणखी बराच काळ लागणार आहे. मुळात हिंदुस्थानला त्याची आवश्यकता नाही. कारण हिंदुस्थानला कोणावरही हल्ला करायचा नाही. चीनचे अनेक शत्रू आहेत. चीनची स्पर्धा अमेरिकेशी असल्याने त्यांना इतक्या दीर्घपल्ल्याची क्षेपणास्त्रs विकसित करण्याची गरज वाटत आहे. हिंदुस्थानला चीन आणि पाकिस्तान या दोनच देशांची भीती आहे. अग्नी-५ हे चीनला डोळ्यासमोर ठेवूनच विकसित करण्यात आले आहे. हिंदुस्थानला इतर शत्रू नसल्याने दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करण्याची गरज नाही. त्यामुळे हिंदुस्थान १०,००० किलोमीटर पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करेल की नाही हे सांगता येत नाही. कारण मुळातच क्षेपणास्त्रनिर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होत असतो. अग्नि-5 हाही अत्यंत महागडा प्रकल्प होता. यासाठी हिंदुस्थानला २५०० कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. आणखी काही चाचण्यांनंतर हे क्षेपणास्त्र सैन्यात दाखल होईल. अग्निचा विकास हिंदुस्थानने गेल्या २७ वर्षांत केला आहे. या चाचणीनंतर जगभरातून विविध प्रतिक्रिया आल्या. यापैकी पाश्चिमात्य जगातून हिंदुस्थानला कोणतीही विरोधी प्रतिक्रिया आली नाही. हिंदुस्थानचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम अत्यंत पारदर्शी आणि जबाबदार असल्याने युरोप किंवा अमेरिकेने विरोध दर्शवला नाही. मात्र चीनने याची धास्ती घेतली असण्याची शक्यता आहे. कारण `आमचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम हिंदुस्थानला गृहीत धरून केलेला नाही त्यामुळे हिंदुस्थानने चीनची बरोबरी करू नये’ अशी प्रतिक्रिया चीनकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानची भीती बाळगण्याचे कारणच नाही. कारण आपली लघु आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रs त्यांच्यासाठी पुरेशी आहेत. अग्नि-5मुळे आता पूर्व युरोप आणि बीजिंग हेदेखील हल्ल्याच्या कक्षेमध्ये आले आहेत. एकुणातच अग्नि विकास कार्यक्रमाने हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा वाढली आहे. सामरिक प्रतिरोधनाच्या दिशेने हिंदुस्थानचा होत असलेला हा प्रवास अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आश्वासक आहे.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या