चीनने बनवला सर्वात उंच पूल; हायस्पीड ट्रेन आणि वाहने एकाचवेळी धावणार

1253

चीनमध्ये बनवण्यात आलेल्या अनेक वस्तूंची चर्चा जगभरात होत असते. चीन एकतर खूप लहान वस्तू बनवतो किंवा प्रचंड आणि महाकाय वस्तू बनवतो. यामध्ये चीनचा हातखंडा आहे. आता चीनने जगातील सर्वात उंच आणि मोठा पूल बनवल्याने त्याची जगभरात चर्चा सुरू आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या पूलाचे वैशिष्ट्य म्हणजे या पूलावरून हायस्पीड ट्रेन आणि वाहने एकाचवेळी धावणार आहेत. त्यासाठी या पूलाची रचना डबलडेकर स्वरुपात करण्यात आली आहे.

जगातील सर्वात उंच पूलाचे नाव पिंगटांग ब्रिज असे ठेवण्यात आले आहे. या पूलाचा मुख्य टॉवर 332 मीटर उंचीवर म्हणजे सुमारे 1090 फूटांवर आहे. या पूलावर एकूण तीन टॉवर आहेत. हे टॉवर केबलने जोडलेले असून त्या आधारावरच ते उभे आहेत. हा पूल गुईझोऊ प्रांतात वाहणाऱ्या काओडू नदीच्या तिरांवर बांधण्यात आला आहे. हा पूल पिंगटांग आणि लुओडियान एक्सप्रेस वेला जोडण्याचे काम करतो. या पूलाची एकूण लांबी 2,135 मीटर म्हणजे 2.13 किलोमीटर आहे. या पूलाच्या दोन्ही बाजूला असलेले भूयारी मार्ग पूलाला एक्सप्रेस वेशी जोडतात.

या पूलावरून पिंगटांग आणि लुओडियानदरम्यान हायस्पीड ट्रेन धावणार आहे. या ट्रेनमुळे पिंगटांग आणि लुओडियानदरम्यानचे अंतर अडीच तासांनी कमी होऊन एका तासावर आले आहे. या पूलामुळे आता  गुईझोऊ प्रांतातील हायस्पीड ट्रेनचा मार्ग 7 हजार किलोमीटर होणार आहे. चीनचा गुईझोऊ प्रांत विविध पूलांसाठी प्रसिद्ध आहे. या प्रांतात 20 हजारपेक्षा जास्त पूल आहेत. हा प्रांत डोंगराळ प्रदेशात असल्याने दळणवळणासाठी या भागात सर्वाधिक पूल बांधण्यात आले आहेत. जगातील 100 सर्वात उंच पूलांपैकी 46 पूल या प्रांतात आहेत. त्यामुळेच हा प्रांत पूलांचे संग्रहालय म्हणून ओळखला जातो.

 

आपली प्रतिक्रिया द्या