चिनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन, कोरोनाबाबत दिली खळबळजनक कबुली

जीवघेण्या कोरोना विषाणूमुळे 2020 हे वर्ष संपूर्ण जगासाठी अत्यंत वाईट वर्ष ठरलं.  या विषाणूच्या फैलावाला चीनमधलं वुहान शहर जबाबदार असल्याचं म्हटलं जातं. इथेच कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. चीनने ही बाब इतर देशांपासून लपवून ठेवली होती आणि यामुळे हा विषाणू जगभर पसरत गेला असं अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे. चीनने मात्र या आरोपांबाबत मौन बाळगत आपल्या चुका लपवण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. मात्र या खोटारड्या चीनचं पितळ एका डॉक्युमेंट्रीमुळे उघड पडलं आहे.

Travellers line up with their belongings outside Hankou Railway Station in Wuhan

चीनने दावा केला होता की या आजाराबाबत त्यांनी सगळी माहिती जगापुढे उघड केली होती.  या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आयटीव्हीने Outbreak: Virus that shook the world  नावाची डॉक्युमेंट्री तयार केली आहे. यामध्ये त्यांनी वुहानमधील वैद्यकीय क्षेत्रातील काही मंडळींचे स्टिंग ऑपरेशन केलं आहे.  या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी हा विषाणू किती घातक होता हे त्यांना माहिती होतं हे सांगताना दिसतायत.  मात्र सरकारने आपल्यावर दबाव टाकून याबाबत खोटं बोलण्यास भाग पाडल्याचं या मंडळींनी स्टिंग ऑपरेशनमध्ये सांगितलं आहे.  स्टिंग ऑपरेशनमध्ये एका कर्मचाऱ्याने सांगितलंय की डिसेंबर 2019 मध्ये त्याचा एक नातेवाईक कोरोनामुळे दगावला होता आणि या नातेवाईकाशी संपर्क आलेली मंडळीही आजाराने बाधित झाली होती. ते पाहिल्यानंतर हा आजार किती भयंकर आहे याची आपल्याला कल्पना आली होती असं या आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले आहे.

wuhan-wet-market

कोरोना एका मानवापासून दुसऱ्या मानवाला संक्रमित होत असल्याचं आरोग्य कर्मचाऱ्यांना कळाले होते असं या डॉक्युमेंट्रीमध्ये म्हटलं आहे.  यातील स्टिंग ऑपरेशनमध्ये दुसऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्याने म्हटलंय की मानवापासून मानवाला कोरोनाचे संक्रमण होऊ शकते हे आम्हाला कळालं होतं, मात्र रुग्णालयातील बैठकीमध्ये याबाबत कोणीही बोलणार नाही अशी ताकीद देण्यात आली होती.

wuhan

वुहानमधल्या स्थानिक नेत्यांनी रुग्णालयांना धमकावलं होतं की या आजाराबाबत कोणी काहीही माहिती द्यायची नाही.  रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना मनापासून वाटत होतं की या आजाराबद्दल लोकांना सांगावं की  नववर्षाच्या उत्सवात सहभागी होऊ नका, कारण यामुळे तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते. मात्र चीन सरकारला कुठल्याही परिस्थिती हा उत्सव साजरा करायचाच होता, ज्यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी गप्प बसण्यास भाग पाडण्यात आलं आहे.

china-korona

चीनने 31 डिसेंबर 2019 रोजी WHO ला कोरोनाच्या 27 रुग्णांबद्दल माहिती दिली होती.  कोरोनामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची माहिती ही चीनने WHO ला जानेवारी 2020च्या मध्यावधीमध्ये दिली होती.  12 जानेवारीला चीनने हा विषाणू मानवातून मानवाला संक्रमित होत नाही असं धादांत खोटी बाब सांगितली होती. 21 जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराबाबत आपला पहिला अहवाल प्रसिद्ध केला होता, मात्र तोपर्यंत चीनमध्ये 278 जणांना अधिकृतरित्या या आजाराने ग्रासलं होतं आणि 3 देशात हा विषाणू  पोहोचला होता.

आपली प्रतिक्रिया द्या