चीनमध्ये न्यायासाठी मोबाईलचा वापर, न्यायमूर्तींवरील भार हलका होणार

462

कोर्टातली तारीख पे तारीख, पुरावे सादर करणे, आरोपीला हजर करणे, युक्तिवाद, वाद-प्रतिवाद हे सगळं टाळून न्यायालयाने फक्त योग्य तो निकालच दिला तर… चीनमध्ये अशाच प्रकारचा झटपट निकाल देण्यासाठी येथील सरकारने मोबाईलचा वापर सुरू केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स न्यायमूर्ती, सायबर कोर्ट तेथे आधीच अस्तित्वात आहेत, पण आता न्यायनिवाडाही चॅट ऍपद्वारे केला जाऊ लागला आहे. त्यामुळे न्यायमूर्तींचा कामाचा भार हलका होणार आहे.

खटले लवकरात लवकर निकाली निघावेत यासाठी चीनमधील सर्वोच्च पीपल्स न्यायालयाने सायबर स्पेस आणि टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. त्यातूनच या वर्षी मार्चमध्येच चीनमध्ये मोबाईलद्वारे न्यायनिवाडा करण्यास सुरुवात झाली असली तरी प्रसारमाध्यमांना रविवारी त्याबाबतची माहिती देण्यात आली. व्ही-चॅट ऍपवर आतापर्यंत 30 लाखांहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

प्रसारमाध्यमांना दाखवली प्रात्यक्षिके
न्यायनिवाडय़ाची प्रक्रिया मोबाईलवरील व्ही-चॅटवर होत असल्याची प्रात्यक्षिकेच प्रशासनाने प्रसारमाध्यमांना दाखवली. यावेळी याचिकाकर्ता व्हिडीओ चॅटिंगद्वारे कसा तक्रार दाखल करतो, न्यायमूर्तींसमोर ते प्रकरण कसे येते, त्यानंतर हाँगझऊ कोर्टात ऑनलाइन वादविवाद, कॉपीराइट केस आणि ई-कॉमर्स प्रॉडक्ट लायबिलिटी क्लेम कसे सादर केले जातात हे सगळे दाखवण्यात आले. फिर्यादी त्याला हवे तेव्हा लॉगइन होऊन न्यायमूर्तींनी दिलेला निकाल ऐकू शकतो. न्यायमूर्तींचा कामाचा भार हलका करण्यासाठीच करण्यात आलेला हा सगळा खटाटोप आहे असे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या